शेतकऱयाच्या कर्जमाफी आणि कर्जमुक्तीसाठी अनुक्रमे विरोधक आणि सत्ताधारी विधीमंडळात आवाज उठवत असले, तरी सर्वसामान्य शेतकरी दुष्काळ आणि हातातील अपुऱया पैशामुळे चिंतीत आहे आणि या स्थितीत आत्महत्या हाच एकमेव मार्ग असल्याचे त्याला वाटते आहे, हे नाशिकमध्ये एका शेतकऱयाने केलेल्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दुष्काळ आणि शेतीच्या कामांसाठी हातात पुरेसे पैसे नसल्यामुळे निराश झालेल्या एका शेतकऱ्याने गुरूवारी नाशिकमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
नाशिकमधील गंगा म्हाळूंगी गावात राहणाऱ्या भाऊराज पालवे यांना शेतातील पिकांना खत घालण्यासाठी पैशांची गरज होती. सुरूवातीला त्यांनी बायकोचे मंगळसूत्र विकून बाजारातून खत आणले. मात्र, एवढे खत साऱ्या पिकाला पुरणार नाही आणि आणखी खत आणण्यासाठी आपल्याकडे पैसा उरलेला नाही, हे पालवे यांच्या लक्षात आले. त्यामुळे आता शेतीतील पीक वाया जाणार या भावनेने नैराश्य आलेल्या पालवे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर पालवे यांचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेऊन त्यांच्या नातेवाईकांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडले. सकाळापासून मृत शेतकऱ्याचे नातेवाईक भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आहेत. दरम्यान, या घटनेमुळे दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याच्या विरोधकांच्या दाव्याला आणखीनच बळ मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader