घराजवळच्या गटाराची गळती थांबवण्याची मागणी दुर्लक्षित करुन अन्याय झाल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर रेडा नेवून चक्क रेड्यासह ठाण मांडले. कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील अन् प्रतिष्ठीत अशा वडगाव हवेली येथील या विलक्षण आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची मोठी त्रेधा उडाली. तर, या गंमतीशीर आणि गावकारभाराचे विदारक चित्र मांडणाऱ्या प्रकाराचे चित्रिकरण समाज माध्यमावर प्रदर्शित झाल्याने याची सर्वदूर जोरदार चर्चा झाली.
हेही वाचा- पुणे: कुष्ठरोग निर्मूलनाचा दावा फोल; १४ वर्षांखालील मुलांमध्ये नव्याने संसर्ग
गेली दोन वर्षे ग्रामपंचायतीने आंदोलनकर्ते दीपक धोंडीराम जगताप घराजवळील गटर गळतीची समस्या सोडवली नव्हती. जगताप यांनी वरचेवर या त्रासाविरुध्द तक्रारी केल्या होत्या. पण त्यावर कार्यवाही न झाल्याने चिडून जावून त्यांनी या अनारोग्याच्या त्रास रेड्यालाही होतोय. म्हणून त्याला जिन्यातून तिसऱ्या मजल्यावर नेत ठिय्या मांडला. यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जगताप यांना रेडा खाली घेवून जाण्याची विनंती केली. पण त्यांनी त्यांना जुमानले नाही. “आधी गटरची गळती काढा, नंतरच मी खाली जातो” असे ठणकावले. दरम्यान, एका गावपुढाऱ्याची आश्वासनासह मध्यस्थी फळास जावून हे आंदोलन जगताप यांनी तूर्तास मागे घेतले.