सावंतवाडी: वैभववाडी तालुक्याला दुसऱ्या दिवशीही पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली. वैभववाडी शहरात बुधवार आठवडा बाजाराला आलेल्या ग्राहकांचीही त्रेधातिरपीट उडाली. या अवकाळी पावसाचा फटका शहरात फिरत्या विक्रेत्यांना चांगलाच बसला. विक्रेत्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी पावसाने सायंकाळी हजेरी लावली. दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका नागरिकांना बसला. वैभववाडी ते करूळ दरम्यान महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू आहे. या पावसाचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना बसला. रस्त्यात ठिकठिकाणी चिखलमाती साचली होती. चिखलात पडून अनेक दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात अनेक मोटरसायकल चालक जखमी झाले. पावसाने पुढील काही दिवस जोर असाच ठेवल्यास आंबा व काजू बागायतदार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.