मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाचे ढग दाटून आले आहे. पावसानं दडी मारल्याने पीक पूर्णपणे करपली. त्यामुळं हाता तोंडाशी आलेला घास जातो की काय? या प्रश्नामुळे शेतकरी चिंतेत आहे. चार वर्षांच्या दुष्काळासोबतचा लढा संपण्याचे चिन्ह धुसर झाल्यामुळे सरकारने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांची ही समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पीकाची पाहणी केली. पण शेतकरी मात्र त्यांच्या दौऱ्यानंतरही असमाधानी आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील पीक परिस्थितीची पाहणी शिवसेनेचे नेते आणि जिल्हयाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केली. मात्र रावतेच्या धावत्या पीक पाहाणी दौऱ्यानंतरही शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही. उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातल्या नागझरवाडी या गावाला रावते यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना अडचणी सांगितल्या. पण पालकमंत्र्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. कारण पाऊस झाला तर पीक हातात येईल, असा भाबडा विश्वास रावते यांनी शेतकऱ्यांना दिला.
एककीकडे पाऊस नाही. दुसरीकडे वीज नाही, अशा परिस्थितीत शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी रावतेंसमोर सांगितलं. एका वीज रोहित्रावर ४० वीज कनेक्शन आहेत. त्यामुळे अनेक वेळा रोहित्र जळण्याच्या घटना घडतात. परिणामी पिकाचं नुकसान झालं. शेतीसाठी वीज मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.