धाराशिव: वेळ अमावास्यानिमित्त (येळवस) सोमवारी जिल्ह्यातील शेतशिवारात नागरिकांची मोठी गर्दी होती. शेतकरी कुटुंबिय मोठ्या उत्साहात शेतातील पाच पांडवाची विधिवत पूजा करून अन्नधान्य बरकतीची अपेक्षा व्यक्त केली.
मार्गशीर्ष अमावास्येला शेतकरी आपल्या शेतशिवारात वेळा अमावस्येचा सण साजरा करतात. नैसर्गिक संकट कितीही आले तरी काळ्या आईची (लक्ष्मीची) पूजा करण्याच्या परंपरेत शेतकऱ्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. हजारो कुटुंबाचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेती कसणारा वर्गही मोठा आहे. शेतीला धनलक्ष्मी मानणारा शेतकरी बांधव शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत काळ्या आईची मनोभावे विधीवत पूजा करून वेळा अमावस्या साजरी केली.
हेही वाचा >>>अखेर बस व चालकाचा परवाना निलंबित…विद्यार्थिनीचा बळी गेलेल्या अपघतात…
वेळा अमावस्येचा हा सण धाराशिव जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा, बिदर जिल्ह्यातही प्रथा सुरू झाली. तिथे येळ अमावस्या, असे म्हटले जाते. त्यामुळे वेळ अमावस्येला येळवस हाही शब्दप्रयोग आपल्याकडे आला. सणाच्या आदल्या दिवशी शेतातील झाडाच्या बुंद्याला कडब्याची इरली कोप तयार करून कोपीत पाच पांडव्याला गेरू, गुन्याची रंगोटी केली गेली. सोमवारी अंबिलाचे बिंदगे डोक्यावर घेऊन शेतीकडे जात होते. कारभारी कारभारीने
वन भोजनाचा आस्वाद
शिवारात ओलिताखालील पिके बहरात आली असली तरी पिकांवरील कीड, अळीचे विघ्न दूर करण्याचा खटापोट करावा लागत आहे. नैसर्गिक संकटाचे कितीही धुके आले तरी शेतकरी कुटुंबासाठी वेळ अमावस्येचा सण एक पर्वणीच असते. बैलगाडीतून सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. अजूनही बरेच शेतकरी कुटुंबीय बैलगाडीतून शेताकडे जात होते. तर बहुतांश जण दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधूनही शेताकडे जात होते. सजगुऱ्याचे (बाजरी) उंडे, कानवले, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी, पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासून बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यापासून तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) आदी खाद्य पदार्थाची मेजवाणी घेत शेतकरी बांधव कुटुंबासह, मित्रमंडळींनी वनभोजनाचा आस्वाद घेतला. जोडीने दिवे पाजळत विधिवत पद्धतीने पाच पांडवाची पूजा केली. त्यानंतर हरभल्या भगतरा जो हरभल्या … चा जयघोष करत ज्वारी, हरभऱ्याच्या पिकात अंबिल शिंपडले गेले.