शेती अन् तीही माती जमिनीशिवाय, अशी कल्पना आपल्याकडे आजवर कोणी केली नसली तरी ती पंचगंगा काठी फुलू लागली आहे. फळभाज्या, फुले, औषधी वनस्पती, पालेभाज्या, वेलभाज्या इतकेच नव्हे तर जनावरांना मोठय़ा प्रमाणात लागणारा ओला चारा अशी कृषी उत्पादनांची मोठी मालिकाच कृषी नवतंत्रज्ञामुळे साकारली जाऊ लागली आहे. कोल्हापुरातील कल्पक उद्योजक संजीव गोखले यांनी याकरिता व्हर्टिकल एरोफोनिक फार्मिग (हवा आणि पाणी तत्त्वावर चालणारे यंत्र) व फॉडर मशीन (वैरण उत्पादन यंत्र) विकसित केले असून त्याचे पेटंटही त्यांनी मिळविले आहेत. देशातील कृषी औद्योगिक क्रांतीतील हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरणार आहे.
बदलते निसर्गचक्र, दुष्काळ यामुळे दुभत्या जनावरांचे पालनपोषण दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी कठीण होत आहे. याच अडचणीवर मात करत जनावरांना वर्षभर पूर्णपणे सेंद्रिय, आरोग्यदायक व हिरवागार ताजा चारा उपलब्ध व्हावा यासाठी मयूरेश इंडस्ट्रीजने फॉडर मशीनची निर्मिती केली आहे. याचबरोबर किचन किंवा टेरेस गार्डन करून ताजा भाजीपाला सहजगत्या उपलब्ध व्हावा यासाठी व्हर्टिकल एरोफोनिक फार्मिग मशीनही तयार केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना गोखले म्हणाले, फॉडर मशीनच्या वापरामुळे शेतकऱ्याला वर्षभर आपल्या जनावरांना हिरवा चारा देणे शक्य होणार आहे. शेती पिकांच्या तुलनेत ५ ते २५ टक्के अधिक उत्पादन, पाणी, ऊर्जेची बचत, मनुष्यबळाची आवश्यकता नाही व इतर अनेक लाभही या मशीनचे आहेत. याची किंमत शेतकऱ्याला परवडेल अशीच आहे. चाऱ्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनक्षमतेत तर वाढ होण्याबरोबरच वैद्यकीय लाभही जनावरांना होतात. बिया पेरणीपासून सात दिवसांमध्ये निरंतर या मशीनमधून हिरव्या चाऱ्याची निर्मिती होते… (उर्वरित वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लि करा)
व्हर्टिकल एरोफोनिक फार्मिग मशीनविषयी माहिती देताना गोखले म्हणाले, मोजक्याशा २४ ते ५० रोपांची लागवड करून जमिनीमधल्या जागेपेक्षा २५ पट अधिक उत्पादन शक्य आहे. हे मशीन मातीविरहित असून हे संपूर्णपणे हवा आणि पाणी तत्त्वावर चालते. शेतीच्या तुलनेत पाणी, खते व कीटकनाशके यामध्येही ९० टक्के बचत होते. याचा वापर किचन तसेच टेरेस गार्डन येथे खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. शहरातील नागरिकांना रोज ताजा भाजीपाला घरच्या घरी घेता येणे शक्य होणार आहे. ग्रीन हाऊसमध्येही वापर करून वर्षभर हवा तेवढा आणि हवा तो भाजीपाला उत्पादित करू शकतो.
खर्चात बचत अन् फायदेच फायदे
किमान जागेत उत्पादन, कामगार, पेरणी, नांगरणी, पाणी, तण काढणे, मशिनरी व वेळ या सर्व खर्चाची बचत होते. पर्यावरणातील कार्बनचे प्रमाण कमी होते. महिला बचतगट व तरुणांना रोजगार किंवा स्वत:चे उत्पादन सुरू करणे शक्य. बाल्कनीमध्ये भाजीपाला करता येऊ शकतो. फळभाज्या-कोबी, फ्लॉवर, ढब्बू मिरची, वांगी, टोमॅटो, गवार, मिरची, आले यांचे उत्पादन घेऊ शकतो.
फुले- गलाटा, निशिगंध, शेवंती, जास्वंदी, गुलाब, मोगरा, अस्टर, झेंडू, झेनिया आदी.
वेलभाज्या- दोडका, कारली, पडवळ, काकडी, भोपळा.
पालेभाज्या- मेथी, पोकळा, चाकवत, कोथिंबीर, पालक आदी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा