हिंगोली शहराला लागून असलेल्या गंगानगर, बळसोंड, तसेच सुराणानगर येथील पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. या पाश्र्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ टँकर सुरू न केल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा सुराणानगर येथील महिलांनी दिला.
जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. औंढा तालुक्यातील संघनाईक तांडा, वसमत तालुक्यातील लोन व पळसगाव या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आणखी १३ गावात विहीर अधिग्रहणातून पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न जि. प. प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, जीवन प्राधिकरण विभागांतर्गत योजनेच्या कामाची दुरुस्ती अजून पूर्ण झाली नसल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य गावात पाणीप्रश्न अजूनही कायम आहे. िहगोली शहराच्या काही भागात जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, ही तीन नगरे ग्रामपंचायतअंतर्गत येत असल्याने पालिकेचे दर व ग्रामपंचायतची अपेक्षा यातून मार्ग निघाला नाही. परिणामी सुराणानगर येथे आजही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी १४ गावातील नळ योजना विशेष दुरुस्ती व तात्पुरती पूरक नळ योजनांच्या कामाच्या अंदाजपत्रकाला नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. योजनेची तांत्रिक तपासणी संबंधित यंत्रणेने करून घेणे आवश्यक राहील, तसेच काम सुरू करण्यापूर्वी, काम चालू असताना व काम पूर्ण झाल्यानंतरचे छायाचित्र काढणे बंधनकारक राहील, अशी अट असल्यामुळे दुरुस्तीचे काम उपयुक्त ठरेल, अशी चर्चा आहे.
सुराणानगर येथील महिलांनी जि. प. प्रशासनाची, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांची भेट घेऊन पाणी प्रश्नावरील व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. दरवर्षीच पाणी प्रश्नावर महिलांना प्रशासनास निवेदन द्यावे लागते. या भागातील पाणीप्रश्न कायमचा सोडविण्याची मागणी या महिलांनी प्रशासनाकडे केली. पाणीप्रश्न गंभीर असल्याने सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, नसता बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा या महिलांनी निवेदनाद्वारे दिला. निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात ज्योती खंदारे, मंदाकिनी सातव, कुसुम सवलके, सुलभा राऊत, कमलाताई देशमुख, गयाबाई सावंत, जयश्री वानखेडे, अनिता घुगे, पौर्णिमा मोरेकर आदी ४० महिलांचा सहभाग होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा