कर्जत: कर्जत श्रीगोंदा रस्त्यावर वालवड शिवारामध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात सुदैवाने जीवित हानी टळली कर्जत श्रीगोंदा रस्त्यावर वालवड गावाच्या शिवारामध्ये ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर रस्त्यावरून वीस फूट खोल रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यामध्ये जाऊन पडला. ट्रॅक्टर चालकाने तत्परता दाखवल्यामुळे तो वाचला. अपघात एवढा भीषण होता की संपूर्ण ट्रॅक्टर तुटला आहे.हा अपघात या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता खराब असल्यामुळे झाला आहे . या परिसरामध्ये मागील एक महिन्यामध्ये झालेला हा आठवा अपघात आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील वालवड गावाच्या शिवारामध्ये आज दुपारी एक वाजता ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत. यामुळे खड्डे चुकवत जात असताना अचानक मोठ्या खड्ड्यामधून ट्रॅक्टर उलटला गेला. व रस्त्याच्या खाली विस फूट खोल असणाऱ्या खड्ड्यामध्ये उसाच्या ट्रॉलीसह खाली जाऊन पडला. यामध्ये शेतकऱ्याच्या उसाचे व ट्रॅक्टरची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.
निखिल कन्स्ट्रक्शन वर कारवाई कधी होणार
श्रीगोंदा ते जामखेड या रस्त्यासाठी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करून सरकारने या रस्त्याची निविदा पाच वर्षापूर्वी प्रसिद्ध केली आहे. या रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतले आहे. काम सुरू होऊन अनेक वर्ष झाले तरी देखील या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेली नाही. या रस्त्याचे अनेक ठिकाणी काम अपूर्ण असताना देखील कंपनी ने या रस्त्यावर कर्जत तालुक्यातील सुपे गावाच्या शिवारामध्ये टोल नाका देखील सुरू केला होता. नागरिकांनी रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे हा टोल नाका बंद पाडला. मात्र अद्यापही रस्त्याचे काम अपूर्ण आहे. रस्त्याची काम अपूर्ण असल्यामुळे अशा प्रकारचे अपघात याठिकाणी सतत होत आहेत. याबाबत या रस्त्याचे काम घेतलेल्या निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीवर तसेच या कामाकडे दुर्लक्ष करणारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.