कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील नामदेव गणपत डाडर (वय ६६) यांनी त्यांचा मुलगा कैलास नामदेव डाडर (वय ४०) याच्या सततच्या मारहाणीस व जाचास कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, कैलास यास अटक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून अन्य सहा जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवल्यानंतरच नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला व नंतर अंत्यविधी करण्यात आला.
या प्रकरणी सुमन नामदेव डाडर यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील नामदेव गणपत डाडर हे शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा कैलास हा वीटभट्टीचा व्यवसाय करतो. याच व्यवसायात तो कर्जबाजारी आहे. नामदेव डाडर यांनी त्यांची तीन एकर शेतजमीन विकून त्याचे कर्ज फेडले होते. मात्र दि. २६ ला रात्री कैलास, त्याची पत्नी सुगंधा, बाळू रावसाहेब खुळे, जयसिंग रावसाहेब खुळे, पदम रावसाहेब खुळे, कल्याण जाणू जगदने व मंगल कल्याण जगदने या सर्वानी येऊन नामदेव डाडर यांना पुन्हा पैसे मागितले व देत नाही म्हणून सर्वानी शिवीगाळ करून मारहाण केली. या वेळी फिर्यादी सुमन नामदेव डाडर यांनी नामदेव डाडर यांना पुन्हा मारहाण होऊ नये म्हणून त्यांना घरात ठेवून बाहेरून कडी लावली. थोडय़ा वेळाने त्या घरात आल्या असता नामदेव डाडर यांनी गळय़ाला फास लावून घेतला होता. मात्र ते जिवंत होते. ते पाहून लोकांनी त्यांना तातडीने नगर येथे जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
या घटनेने अन्य नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवावा व सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही व अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका घेतली होती. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी पाटेगाव येथे येऊन मृताच्या मुलासह अन्य सात जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. कैलास यास अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा