महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते घेण्यास बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी नकार दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दांपत्यासंदर्भात कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त विधाने लक्षात घेता त्यांच्या हातून पुरस्कार घेण्याऐवजी मी कार्यालयात जाऊन तो स्वीकारेल असं राजेंद्र पवार यांनी म्हटलंय.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधील सुप्त संघर्ष वेळोवेळी समोर आला आहे. आता हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने राजेंद्र पवार यांना कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर केलेला आहे. “हा आज पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. पण ज्या महान व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे त्या व्यक्तीने भारतातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतरच्या मंत्रीमंडळामध्ये प्रचंड कार्य केलेलं आहे. अशा व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे,” असं सांगताना तो राज्यपालांच्या हस्ते स्वीकारण्याची आपली इच्छा नाही असं राजेंद्र पवार म्हणालेत.
राजेंद्र पवार यांनी यामागील भूमिका स्पष्ट करताना राज्यपालांनी शेतकऱ्यांची काळजी करणारा रयतेचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने आपल्याला त्यांच्या हातून पुरस्कार नको असल्याचं म्हटलंय.
“आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी मुघलांचं एवढ्या प्रचंड प्रमाणात आक्रमण होत असताना शेतकऱ्यांकडे अतिशय बारीक त्यांचं लक्ष होतं. त्यांच्या आज्ञापत्रामध्ये भाजीच्या देठालाही हात न लावण्याचे निर्देश असल्याचं आपल्याला दिसून येतं. उभ्या पिकात घोडी घालू नका. तुम्हाला स्वराज्यासाठी डोलकाठ्या हव्या असतील तर त्या तुम्ही त्याला राजी करुन घ्या, इतका बारीक विचार करणारा हा राजा. असं असतानाही या राजाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास न समजून घेता वादग्रस्त विधानं करुन राज्याला शांतता हवी असताना ती न ठेवता कारण नसताना शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीकडून हा पुरस्कार घेणार नाही,” असं राजेंद्र पवार म्हणाले आहेत.
“शिक्षणाच्या दृष्टीने सर्वसमान्यांना शिक्षणाचं कवाडं उघडी केली. ज्यांनी १८७० च्या दरम्यान शेतकऱ्याचं असूड लिहिलं. शेतकऱ्यांनी कसं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, पाण्याचं काय केलं पाहिजे यास विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. अशा या महाराष्ट्राच्या इतिहासावर कारण नसताना वादग्रस्त विधान करणारे आणि आपल्या अस्मितांवर जे घाला घालतात. अशा या महान व्यक्तीच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा ज्या महाराष्ट्र कृषी विभागाने हा पुरस्कार दिलाय. त्यांच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार स्वीकारणं मला अभिमानाचं वाटेल,” असं राजेंद्र पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.