शहरी नक्षलवाद प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या मृत्यूवरून केंद्रीय यंत्रणा आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आपल्या रोखठोक सदरातून स्वामी यांच्या मृत्यूबद्दल भाष्य करताना मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाने स्वामी यांच्या मृत्यूबद्दल राज्य सरकारकडे बोट करत राऊतांना सवाल केला आहे.
“सन्माननीय रोखठोक संजय राऊत, सत्ता टिकवण्यासाठी आपण जरूर केंद्रावर टीका करा. राजकीय मतभेद ठेवा. सत्तेसाठी हिंदुत्व तर सोडलच आहे, पण किमान वस्तुस्थितीवर आधारित तरी लिहा. आपण कुणाचे समर्थन करीत आहात हे तरी पहा. राज्य सरकारच्या अपयशाकडे तुम्ही लक्ष वेधत आहात. फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यु दुर्दैवीच आहे पण ते न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगवास भोगत होते, आदेशात काय म्हटल आपल्या माहितीसाठी (न्यायालयाच्या आदेशाची प्रत). प्रथमदर्शनी स्टॅन स्वामी देशात अराजक निर्माण करून सरकार उलथविण्याच्या प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या उद्देशानुसार काम करीत असल्याने जामीन नकारला आहे,” केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
सन्माननीय रोखठोक @rautsanjay61 सत्ता टिकवण्यासाठी आपण जरूर केंद्रावर टीका करा, राजकीय मतभेद ठेवा, सत्तेसाठी हिंदुत्वतर सोडलच आहे पण किमान वस्तुस्थितीवर आधारीत तरी लिहा. आपण कोणाचे समर्थन करीत आहात हे तरी पहा. राज्य सरकारच्या अपयशाकडे तुम्ही लक्ष वेधत आहात. १/३
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 11, 2021
“न्यायालयानेस्वामी यांचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळूला होता. स्वामी यांना NIA ने ताब्यात घेतले होते पण ते तळोजा न्यायालयीन कोठडीतहोते. इथे राज्य सरकार त्याचे नियंत्रण करते. स्वामी यांच्या इच्छेनुसार त्यांना रूग्णालयात दाखल केले होते मग या मृत्यूला राज्य सरकारला जबाबदार नाही का?,” असा सवाल उपाध्ये यांनी संजय राऊत यांना केला आहे.
न्यायालयानेस्वामी यांचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळूला होता. स्वामी यांना NIA ने ताब्यात घेतले होते पण ते तळोजा न्यायालयीन कोठडीतहोते. इथे राज्य सरकार त्याचे नियंत्रण करते. स्वामी यांच्या इच्छेनुसार त्यांना रूग्णालयात दाखल केले होते मग या मृत्यूला राज्य सरकारला जबाबदार नाही का?३/३
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 11, 2021
संजय राऊत काय म्हणालेत?
“जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींना जामीन द्यावा यासाठी विनंती केली. जर्मनीच्या मानवाधिकार आयुक्तांनी, संयुक्त राष्ट्रानेही विनवणी केली. पण पाण्याचा ग्लास उचलून तोंडासही लावू न शकणाऱ्या फादर स्वामींना शेवटी तुरुंगातच मारण्यात आले. एल्गार परिषद हे एक जहर पसरवणारे थोतांडच होते, तेथील जहरी आरोळ्या व गर्जना ज्यांनी केल्या त्यांचे समर्थन कोणीच करू नये. पण त्यानिमित्ताने नंतर जे घडविण्यात आले ते ‘मुस्कटदाबी’चे षड्यंत्रच म्हणावे लागेल. सरकार उलथविण्याचा कट! राज्य उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र, देशद्रोह आणि देशविघातक कारवाया म्हणजे काय? जंगलातील आदिवासींना त्यांच्या हक्कांची, स्वातंत्र्याची जाणीव करून देणे हे देश उलथवून टाकणे झाले काय? विद्रोहाची ठिणगी टाकून मने पेटवणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो? नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्या कवितांचा अनुवाद जगभरात गेला. त्यांच्या कवितेतला विद्रोह हा कुणाला देश उलथवण्याचा प्रकार वाटला नाही. गुलामांना गुलाम असल्याची जाणीव करून देण्यातच मानवता व स्वातंत्र्याचा लढा आहे, असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले तो काय देश उलथवून टाकण्याचा प्रयोग होता? आग लावा त्या मंत्रालयाला असे सांगून तरुणांचे रक्त पेटविणारे बाळासाहेब ठाकरे हे काय देश उलथवून टाकण्याचे कारस्थान रचत होते? कम्युनिझमच्या विविध प्रवाहांशी आपले मतभेद आहेत. माओवाद, नक्षलवाद हे भयंकर प्रकार आहेत. पण माओवाद्यांचा राजकीय पक्ष, संघटना, सत्ता, व्यवस्था जगात अनेक ठिकाणी आहे. ते सर्व लोक कश्मीरातील अतिरेक्यांपेक्षा भयंकर आहेत हे मान्य केले तरी ८४ वर्षांच्या विकलांग, हतबल फादर स्टॅन स्वामींच्या तुरुंगातील हत्येचे किंवा मृत्यूचे समर्थन होऊ शकत नाही!,” असं राऊत यांनी रोखठोक सदरातील लेखात म्हटलेलं आहे.