धर्माबाद तालुक्यातील चिकना येथील घटना

नांदेड : तंबाखूच्या पिकाला धूर देत असताना तोल जाऊन खड्डय़ात पडलेल्या वडिलांना काढताना मुलाचाही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी धर्माबाद तालुक्यातील चिकना येथील शेतात घडली.

चिकना येथील शेतकरी शेख चांदपाशा खाजामियां (वय ५५) यांनी आपल्या शेतात तंबाखूचे पीक लावले होते. या तंबाखूच्या पिकास रविवारी रात्रीपासून धूर देण्याचे काम करीत असताना शेख चांदपाशा यांचा तोल जाऊन ते खड्डय़ात पडले. वडिलांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी मुलगा वंशोद्दीन प्रयत्न करीत असताना त्याचाही तोल गेला. तोही खड्ड्यात जाऊन पडल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

घटनेची माहिती पोलीस व महसूल प्रशासनास देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक भागवत जायभाय, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी यांनी दाखल होऊन पंचनामा केला आहे. करखेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

Story img Loader