वाई:दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू असल्याने दुग्ध व्यवसाय व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पुणे मुंबईकडे जाणाऱ्या चाळीस दूध टँकरची आनेवाडी टोलनाक्यावर अचानक तपासणी केली.यामुळे टँकर चालकांमध्ये एकच खळबळ उडाली.
राज्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे या भेसळीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. दूध भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.दूध भेसळ रोखण्यासाठी दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय समितीला दिल्या होत्या.त्यानुसार मागील काही दिवसांपासून साताराजिल्ह्यातील दूध डेअऱ्यांवर समितीमार्फत धाडी टाकण्यात येत आहेत.
हेही वाचा >>> सांगली : मिरजेत दमदार पावसाची हजेरी
पुणे बेंगलोर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर आज सकाळी आठ वाजल्यापासून पुणे मुंबईकडे दुधाची वाहतूक करणाऱ्या टँकरची तपासणी करण्यात आली. अचानक तपासणी सुरू झाल्याने टँकर चालकांमध्ये एकच खळबळ उडाली. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ, वारणा, वाळवा, सकस, थोटे, चितळे व कर्नाटकातील नंदिनी सह अन्य दूध टँकरची तपासणी करण्यात आली. ही तपासणी मोहीम सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. ४० टँकर मधील साडेचार ते पाच लाख लिटर दुधाची तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे, अन्न व औषध विभागाचे अधिकारी इम्रान हवलदार ,वंदना रूपनवर तसेच दुग्ध व्यवसाय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केली.मागील आठवड्यात साताऱ्यात काही डेअ ऱ्यां मध्ये भेसळ युक्त दूध आढळून आल्यानंतर ते ओतून देण्यात आले होते. यानंतर हि तपासणी करण्यात आल्याने ग्राहक आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>> सातारा: जगप्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा बहर येत्या रविवारपासून पहाता येणार
पॅकिंग पिशव्यांमधील दुधाची तपासणी तपासणी करताना टँकर मधील दुधाचे प्रत्येकी दोन दोन नमुने घेण्यात आले आहेत. पॅकिंग पिशव्यांमधील दुधाची ही तपासणी अधिकाऱ्यांनी केली. दुधाची घेतलेले नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.दुधामध्ये भेसळ निघाल्यास संबंधितांवर जिल्हास्तरीय समितीमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीच्या वेळी अधिकाऱ्यांनी टँकर चालकांना आवश्यक त्या सूचनाही केल्या.