निफाड तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. अबालवृद्ध भीतीच्या छायेखाली वावरत असून खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडणे टाळले जात आहे. चिमुरडय़ांना अंगणात खेळण्यावरही अघोषित बंदी आली आहे. एकंदर स्थितीमुळे काहींना बालकांच्या संरक्षणासाठी अंगणात तसेच मळ्यात संरक्षक जाळीत मुलांना ठेवत शेतीचे काम करावे लागत आहे.
निफाड तालुका म्हणजे द्राक्ष, उसामुळे सदाहरित असणारा गोदाकाठावरील भाग. बिबटय़ाचा संचार व हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्रा, बकरी आणि गायी, वासरे यांच्यावर बिबटय़ाचा हल्ले होत असताना शिवरे येथे दोन बालकांवरील हल्ल्यानंतर म्हाळसाकोरे येथील युवा शेतकरी शुभम पोटे यांच्या मुलावर बिबटय़ाने हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले होते. बिबटय़ाचा हल्ला चापड गावच्या गोकुल पीठेच्या जीवावर बेतला. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी शिंगवे गावात अंगणात खेळणाऱ्या साडेचार वर्षीय दीपावली कोठे या मुलीवर बिबटय़ाने हल्ला चढविला. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनाक्रमामुळे शेतीसाठी बाहेरगावहून येणाऱ्या मजुराची संख्या कमी होत आहे. परिणामी दैनंदिन शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. बिबटय़ाच्या दहशतीमुळे मजुरांनी दांडी मारल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मळ्यावर वास्तव्य करावे लागते. बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाने गस्त वाढविली असून पाच पिंजरे लावले आहेत. मात्र अद्याप बिबटय़ा जाळ्यात सापडलेला नाही. ग्रामस्थांनी आपल्या परीने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. बिबटय़ाच्या दहशतीमुळे काहींनी लहानग्यांसाठी अंगणात लोखंडी जाळीचा वापर करून तटबंदी तयार करून त्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी
घेतली आहे. करंजगावच्या भेंडाळी रस्त्यावरील नीलेश पावसे यांनी शेतात भाचा सुदर्शन याच्यासाठी लोखंडी जाळी आणि पत्र्याच्या मदतीने ८ बाय १४ चौरस फूट आकाराची सुरक्षित जागा तयार करवून घेतली. या ठिकाणीच सुदर्शन थांबतो व खेळतो. त्याच्याकडे आजी, आई लक्ष ठेवतात.

Story img Loader