सांगली : कोयना व चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने कृष्णा-वारणा काठावरील जिल्ह्यातील नदीकाठी असलेल्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला असून धास्ती वाढली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पश्‍चिम भागात रात्री कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढला असून सांगलीत कृष्णेची पाणीपातळी २७ फूटावर स्थिरावली असली तरी बुधवारी यामध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.

कोयना धरणासह पश्‍चिम घाटात मुसळधार पाउस अजून सुरू असून कोयनेतील पाणीसाठा  ६४.५५ टीएमसी झाला असून धरण ६१ टक्के भरले आहे. तर चांदोली धरणात २८.१५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ८१ टक्के भरले आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. तर चांदोली धरणातून दुपारी १२ वाजलेपासून धरणाचे दोन वक्र दरवाजे एक मीटरने उचलण्यात आले असून यामधून २२०० क्युसेकने आणि विद्युुतगृहातून  १६०० असा एकणू ३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग प्रति सेकंद या गतीने नदीपात्रात करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>वृध्दाश्रमात वृध्दाचे निधन; पित्याच्या अंत्यदर्शनासाठीही मुलगा आला नाही

पश्‍चिम भागात सुरू असलेली संततधार आणि नदीपात्रात सुरू करण्यात आलेला विसर्ग यामुळे कृष्णा, वारणा नदीपात्रातील पाणी पातळी वाढत आहे. काल रात्रीपासून सांगलीत पाणी पातळी २७ फूटांवर स्थिरावली असली तरी उद्या सकाळपर्यंत ही पातळी ३० फूटापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला  जात आहे. यामुळे सांगलीतील सुर्यवंशी प्लॉट, काकानगर, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता आदी भाग पूराच्या पाण्याने वेढला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १२.१ मिलीमीटर पाउस झाला असून शिराळा तालुकयात सर्वाधिक ३१ मिलीमीटर पाउस नोंदला गेला असल्याचे पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.