अलमट्टी धरणाच्या सध्याच्या उंचीने सन २००५ सालच्या महापुराने उडविलेल्या हाहाकाराच्या स्मृती अजूनही ताज्या असतांनाच आणि थोडय़ाशा पावसानेच कृष्णा-पंचगंगा काठच्या शेकडो गावात पुराचे पाणी शिरत असल्याचा अनुभव प्रतिवर्षी येत असतांना आता अलमट्टी धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढणार असल्याने भविष्यात होणाऱ्या जलप्रलयाच्या भीतीने आत्तापासूनच कृष्णा खोऱ्यातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अलमट्टी धरणाची उंची ५२४.२६ मीटर इतकी करण्यास हिरवा कंदील मिळाला असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. महापुराच्या धोक्याची जाणीव स्पष्टपणे जाणवू लागल्याने या विरोधात नागरिकांसह राजकीय पक्षांचा आवाज बुलंद होऊ लागला आहे.
कृष्णा जल लवादाने शुक्रवारी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यातील पाणी वाटपाबाबतचा निर्णय घोषित केला. त्याचवेळी कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५१९.६० मीटरवरून ५२४.२६ मीटर इतकी करण्यास परवानगी दिली. कर्नाटक राज्यासाठी हा निर्णय सुजलाम सुफलाम करणारा असला तरी तो दक्षिण महाराष्ट्राच्या मुळावर येणारा आहे. अलमट्टी धरणाची उंची तब्बल ५ मीटरने वाढणार असल्याने त्यामध्ये प्रचंड प्रमाणात जलसंचय होणे स्वाभाविक असून त्यामुळेच दक्षिण महाराष्ट्राला पावसाळ्यात महापुराचा सामना दरवर्षी करावा लागणार आहे.
सध्याची अलमट्टी धरणाची उंची ही कोल्हापूर-सांगली या शहरांसह कृष्णा-पंचगंगा काठच्या शेकडो गावांना त्रासदायक ठरत आहे. सन २००५ सालच्या महापुराने जो हाहाकार घातला त्यामागे अलमट्टी धरण हे मुख्य कारण होते. हेच धरण आणखी पाच मीटरने वाढल्याने धरणातील जलसंचय वाढत जावून त्याचे ‘बॅकवॉटर’ महाराष्ट्रासाठी धोक्याची रेषा घेऊनच वाहणार आहे. नृसिंहवाडी जवळील राजापूर बंधारा ते अलमट्टी धरण या सुमारे सव्वा दोनशे किलोमीटर अंतरात कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा पावसाळ्यात लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. परिणामी कृष्णा नदीमध्ये सामावणारे कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा,वेदगंगा अशा अनेक नद्यांचे पुराचे पाणीही त्यातच सामाविले जाणार आहे. त्याचा मोठय़ा प्रमाणात फटका कृष्णा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना बसणार आहे. यामुळे धोक्याची जाणीव होऊ लागल्यानेअलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी कोल्हापूर-सांगली भागात आंदोलनाला सुरूवातही झाली आहे.
यावर्षी पावसाळ्यात वरूणराजाने चांगलीच हजेरी लावली. कृष्णा-पंचगंगा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावात व शेतामध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यातील धोका लक्षात आल्यावर पाटबंधारे विभागातील अधिकारी अलमट्टी धरणावर पोहोचले होते. कर्नाटक व महाराष्ट्रातील अधिका-यांनी कृष्णानदीच्या पाण्याचा विसर्ग योग्य प्रमाणात ठेवल्यामुळे महापुराचा धोका अधिक प्रमाणात झाला नाही. पण धरणाची उंची पाच मीटरने वाढल्यास पाणी नियोजनात थोडी जरी तफावत राहिली तरी गावेच्या गावे महापुराच्या विळख्यामध्ये अडकली जाणार आहेत. शिवाय कृष्णा नदीपात्रातील गाळ काढण्यासारख्या उपाययोजना सरकारी कामाची गती पाहता जलदरीत्या पूर्ण होण्यासारख्या नाहीत. कोल्हापूर व इचलकरंजी या शहरातून मोठय़ा प्रमाणात मैलायुक्त सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये सोडले जाते. तेच पाणी पुढे कृष्णेमध्ये मिसळले जाते. त्याचे हे दुष्पपरिणाम भोगावे लागणार ते वेगळेच. याची दखल घेऊन राज्य शासनाने नव्याने कृतिशील भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
राजकीय पातळीवर हालचाली
अलमट्टी धरणाची उंची वाढणार असल्याने कृष्णाकाठच्या गावांना निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन राजकीय नेते व पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सांगलीचे पालकमंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी हा विषय राज्य शासनाकडे उपस्थित करणार असल्याचे सांगितले आहे. खासदार राजू शेट्टी यांनी कृष्णेच्या पाणी उताऱ्यामध्ये फरक पडल्याने गंभीर धोके उद्भवणार असल्याचे नमूद करून लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेने मोर्चा काढून प्रशासनाला धोक्याची जाणीव करून दिली आहे. तर, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा