रवींद्र केसकर

करोना निर्बंधांमुळे तुळजापुरात यंदा चैत्री यात्रेपासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या यात्रांवर गदा आली आहे. नवरात्रोत्सवासह या काळात न भरलेल्या या यात्रांमुळे यंदा या तीर्थक्षेत्री तब्बल शंभर कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प होण्याची भीती आहे.

मार्च महिन्यातील चैत्री यात्रेपासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरी भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र यात सर्वाधिक गर्दी ही नवरात्रोत्सवात होत असून या काळातच शहरातील छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱ्यांपासून ते विविध सेवा पुरवणाऱ्यांचे अनेक व्यवसाय तेजीत असतात. नारळ, कुंकू, हार, फुले विक्रेत्यांपासून ते हॉटेल, लॉज व्यावसायिकांपर्यंत. परंतु यंदा भाविकांअभावी हे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत.

तुळजापूर शहरात नारळाचे चार मोठे व्यापारी आहेत आणि त्यांच्याकडून नारळ विकत घेऊन खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या छोटय़ा विक्रेत्यांची संख्या ६० ते ७० च्या घरात आहे. वर्षांकाठी तुळजापूर शहरात ५० लाख नारळांची विक्री होते. मात्र यंदा चैत्री यात्रेपासून ही सर्व दुकाने बंद आहेत. या एकटय़ा नारळ विक्रीवर शेकडो जणांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. टाळेबंदीमुळे चालू वर्षांत एक मालमोटार भरूनही नारळ मागवला नसल्याचे ठोक व्यापारी दयानंद दुलंगे यांनी सांगितले. नुसत्या नारळाच्या व्यापारातून पंधरा ते वीस कोटी रुपयांची उलाढाल तुळजापूर शहरात होते.  तुळजापूर म्हटले की ‘आई राजा उदो-उदो’चा जयघोष आणि कुंकवाची मुक्त उधळण हे चित्र आपोआप डोळ्यासमोर येते. मागील सहा पिढय़ांपासून हळकुंडाचे कुंकू तयार करणाऱ्या वझे कुटुंबीयांनाही यंदा मोठा फटका सहन करावा लागला आहे. दरवर्षी ८०० किलो कुंकू आणि २०० किलो हळद, असे साधारण ३५ ते ४० लाख रुपयांचे उत्पादन वझे यांच्या कारखान्यात केले जाते. सात महिन्यांपासून हा कारखाना बंद आहे. वयाची सत्तरी गाठलेले नागनाथ वझे यांनी आपल्या सबंध आयुष्यात पहिल्यांदाच नवरात्रोत्सव ठप्प पाहिल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त केम येथून हजार क्विंटलहून अधिक भडक कुंकू तुळजापूरच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते.

साधारणपणे नवरात्रोत्सवाच्या कालावधीत पाच हजार पोते चुरमुरे विक्री केले जातात. तर पाचशे पोती खडीसाखर या कालावधीत विकली जाते. जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी आलेला सर्वसामान्य भाविक किमान ५० ग्रॅम पेढा विकत घेतो. तुळजापूर शहरात पेढा तयार करणाऱ्या पाच मोठय़ा भट्टय़ा आहेत. त्यावर शंभर जणांचे कुटुंब अवलंबून आहे. भट्टय़ा बंद असल्यामुळे हे सर्व मजूर सध्या सोयाबीन काढणीच्या कामाला लागले आहेत. नवरात्रोत्सवातील १५ दिवसांत पाच टनाहून अधिक पेढय़ांची विक्री होते. ११० ते १५० रुपये किलो, असे त्याचे दर असतात. स्थानिक पेढा उत्पादकांबरोबरच सरमकुंडी, पाचड, येरमाळा, सोलापूर, लातूर येथील पेढा उत्पादकही नवरात्रोत्सवाच्या कालावधीत तुळजापूर शहरात दाखल होत असतात.

जगदंबेचे दर्शन घेतल्यानंतर परती, पोत, बांगडय़ा, कवडय़ांची माळ मोठय़ा श्रद्धेने भाविक खरेदी करतात. तुळजापूर शहरातील बुरुड समाज प्रामुख्याने या व्यापारात आहे. हातावर पोट असलेल्या बुरुड समाजातील किरकोळ विक्रेत्यांचे मागील सात महिन्यांपासून हाल सुरू आहेत. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दुकानाच्या भाडय़ापोटी लागणारी रक्कम १०० टक्के जमा होते. त्यामुळे व्यापारी वर्षभर निश्चिंत असतात. यंदा नवरात्रोत्सवासह सर्व प्रमुख यात्रा करोनामुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापुरातील १०० कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प होणार आहे.

Story img Loader