इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपाकडून होत असलेली टीका हास्यास्पद आहे. देशभरातील २८ पक्ष मोदी सरकार विरोधात एकत्र आले आहेत, बंगलुरु मध्ये इंडिया आघाडीची दुसरी बैठक होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी घाईघाईने एनडीएची बैठक बोलावली. इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी व भाजपा घाबरलेले आहेत, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणालेत. दादर येथील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात राहुल गांधी यांच्या सत्काराच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात ६२ टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही असे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. इंडिया आघाडी भक्कमपणे उभी आहे म्हणून भाजपाकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRS सारख्या पक्षांना पुढे केले जात आहे, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा भाजपवर निशाणा साधला.

देशातील हुकूमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच मुंबईत १ सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने जननायक राहुल गांधी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचाः VIDEO : अप्पर-वर्धा धरणग्रस्तांच्या मंत्रालयातील जाळीवर उड्या, एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देत म्हणाले…

दादर येथील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात राहुल गांधी यांच्या सत्काराच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नाना पटोले प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची खासदारकी रद्द केली, त्यानंतर त्यांना सरकारी घरही खाली करावयास भाग पाडले पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोदी सरकारला राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करावी लागली. मोदी सरकारवरील अविश्वासदर्शक ठरावात भाग घेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर तुफान हल्ला केला. मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर तोफ डागली. देशातील हुकुमशाही कारभाराला सडेतोड उत्तर देणाऱ्या राहुल गांधी या काँग्रेसच्या निडर योद्ध्याचा सत्कार १ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचाः “सचिन तेंडुलकरनं भारतरत्न परत करावा, ३०० कोटी घेऊन…”, ‘त्या’ प्रकारावरून बच्चू कडू आक्रमक!

महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून, काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे. मोदी सरकारचा पराभव करणे हाच मविआचा उद्देश असून ही आघाडी त्यावर भर देत आहे, असे नाना पटोले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारमध्ये अंतर्विरोध आहे. या सरकारला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी अजून त्यांना पालकमंत्री नियुक्त करता आले नाहीत, मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे, असंही पटोले म्हणाले.

निधी वाटपावरूनही सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरु आहेत. सरकारधील वादाचा फटका शेतकरी, तरुण, कामगार, व राज्यातील गुंतवणूकीवर होत आहे. महाराष्ट्रात अस्थिर राजकीय परिस्थिती असल्याने कोणताही मोठा गुंतवणुकदार येत नाही. वेदांता फॉक्सनसारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला. आताही ऍपल कंपनीने ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तामिळनाडू, कर्नाटक राज्यात केली आहे. यामुळे राज्यातील तरुण रोजगारांपासून वंचित राहत आहेत. कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जपान, चीन मध्ये कांदा २००-३०० रुपये किलो आहे, कांदा निर्यात केला तर शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतील म्हणून केंद्र सरकारने तात्काळ निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fearful of india alliance modi hurried meeting of 38 parties says prithviraj chavan vrd