वैद्यकीय शिक्षण घेणे दिवसेंदिवस अधिकाधिक खर्चीक होत असतानाच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीय शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी व पात्रता शुल्कातही तिप्पट वाढ केली आहे.
कोणत्याही वैद्यकशाखेच्या प्रथम वर्षांस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांला शासकीय महाविद्यालयात पात्रता व नोंदणी शुल्कापोटी यापूर्वी प्रत्येकी ३३० असे एकूण ६६० रुपये भरावे लागत होते. आता ते प्रत्येकी १,००० याप्रमाणे दोन हजार रुपये करण्यात आले आहे.
गेल्या दहा वर्षांत नोंदणी व पात्रता शुल्कात वाढ केली नव्हती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत विद्यापीठाने शुल्कवाढीचे समर्थन केले आहे. दरवर्षी पदवी अभ्यासक्रमांना सुमारे १६ हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यांना वाढीव शुल्काची झळ बसेल. याआधी विद्यापीठाने फेलोशिप व प्रमाणपत्र अभ्यासक्रमातही अशीच वाढ केली आहे.
वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून प्रारंभी एकदाच नोंदणी व पात्रता शुल्क घेतले जाते. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांमधील राखीव संवर्गासाठी हे शुल्क प्रत्येकी एक हजार म्हणजे एकूण दोन हजार रुपये राहील. यापूर्वी ते एकत्रितपणे ६६० रुपये होते. खासगी महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस ६,५०० (आधीचे शुल्क ५८३०), अनिवासी भारतीय व परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांस एक हजार अधिक ७७० अमेरिकी डॉलर (आधीचे शुल्क ३३० अधिक ७७० अमेरिकी डॉलर) भरावे लागतील. परराज्यातील विद्यार्थ्यांस वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यासाठी २८ हजार ५०० रुपये मोजावे लागतील. दंत शाखेसाठी शासकीय महाविद्यालयात सर्वसाधारण, राखीव संवर्ग व परदेशस्थ विद्यार्थ्यांना उपरोक्त शुल्क राहणार असले तरी खासगी महाविद्यालयात पात्रता व नोंदणी शुल्कापोटी राज्यातील विद्यार्थ्यांस सहा हजार, तर परराज्यातील विद्यार्थ्यांस २६ हजार भरावे लागतील.
आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांसाठीचे शुल्क
* ४३०० रु. : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी
* ९२२० रु. : परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी
* ९२५० रु. : परदेशस्थ व अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी
पदव्युत्तर शिक्षणही महाग
* वेगवेगळ्या पदव्युत्तर शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वाढीव पात्रता शुल्काची झळ सोसावी लागणार आहे.
* विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांस अडीच हजार रुपये, परराज्यातील विद्यार्थ्यांना १० हजार, तर खासगी महाविद्यालयात ५०,००० असे शुल्क द्यावे लागेल.
* पदविका शिक्षणक्रमासाठी हे शुल्क अनुक्रमे २५००, ९००० आणि ४०,००० असेल.
* पदव्युत्तर डीएमएलटीसाठी २१००, ३०००, ५००० रुपये असेल.
* दंत शाखेतील पदव्युत्तर पदवीसाठी २५००, ६०००, १२००० रुपये असेल.
* पदविकेसाठी २५००, ५०००, १२००० रुपये, होमिओपॅथीसाठी खासगी महाविद्यालयात ६,८८० रुपये मोजावे लागतील.