सोलापूर : ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या त्यांच्याच एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश माने-मुसळे (वय ४५) हिची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस तपास अधिकाऱ्यांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे आदेश दिला.

गेल्या १८ एप्रिल रोजी रात्री रेल्वे लाईन-मोदी खाना परिसरातील आपल्या निवासस्थानी डॉ. वळसंगकर यांनी स्वतःच्या कानशिलात रिव्हाल्व्हरने गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांच्या रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा माने-मुसळे हिला जबाबदार ठरविले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी रात्री सदर बझार पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्याचवेळी तिला अटकही करण्यात आली होती.

आरोपी मनीषा माने-मुसळे हिला सुरुवातीला तीन दिवस आणि नंतर वाढीव दोन दिवस अशी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यामुळे तिला पुन्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी पोलीस तपास अधिकाऱ्यांनी स्वतःहून आरोपी मनीषा माने-मुसळे हिला पुढील तपासासाठी पोलीस कोठडीचा हक्क राखून १४ दिवस न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तेव्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही मागणी तत्काळ मान्य करीत तसा आदेश दिला. याप्रकरणावर काही मिनिटांत सुनावणी झाली. यावेळी आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे यांना युक्तिवाद करण्याची गरज भासली नाही.

पाच दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान पोलीस तपास अधिकारी अजित लकडे यांनी आरोपी मनीषा माने-मुसळे हिने ईमेलद्वारे मृत डॉ. वळसंगकर यांना धमकावले होते. रुग्णालयात केलेल्या आर्थिक व्यवहारावरून डॉ. वळसंगकर यांनी तिचे अधिकार कमी केले होते. तसेच तिचा पगारही कमी केला होता. त्यामुळे चिडून मनीषा माने-मुसळे हिने डॉ. वळसंगकर यांना असह्य त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला. रुग्णालयातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आरोपी मनीषा माने-मुसळे हिच्या विरोधात तक्रार केली होती. त्याबाबतही तपास करण्यात आला. वळसंगकर कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली.