सोलापूर : सोलापुरातील नामवंत मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्याच रुग्णालयातील एका महिला अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. तिला तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. अधिकारात कपात केल्याने आणि पगार कमी केल्याने या महिला अधिकाऱ्याने डॉ. वळसंगकर यांच्यावर घाणेरडे आरोप करून धमकावल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
मनीषा महेश माने-मुसळे (वय ४५, रा. बसवराज नीलयनगर, जुळे सोलापूर) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याशी संबंधित असल्याचे बोलले जाते. तिच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. वळसंगकर यांचे पुत्र, मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. अश्विन वळसंगकर यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार मनीषा माने-मुसळे ही डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयात २००८ पासून नोकरीस होती. तिला मोठा पगार देऊन प्रशासकीय अधिकारीपदावर नेमण्यात आले होते. घटनेच्या आदल्या दिवशी, १७ एप्रिल रोजी तिने डॉ. वळसंगकर यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून, आपले अधिकार कापल्याने आणि पगार कमी केल्याने मी माझ्या दोन्ही मुलांना मारून टाकते आणि रुग्णालयात येऊन पेटवून घेते. त्यास संपूर्ण वळसंगकर कुटुंबीय आणि रुग्णालयातील कर्मचारी जबाबदार राहाल, अशी धमकी दिली होती. तिच्या या खोट्या आणि घाणेरड्या आरोपवजा धमकीमुळे डॉ. शिरीष वळसंगकर हे व्यथित झाले होते. त्यामुळेच त्यांनी १८ एप्रिल रोजी रात्री राहत्या निवासस्थानी रिव्हाल्व्हरने स्वतःच्या कानशिलात दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी लिहून ठेवलेले पत्र त्यांच्या पॅन्टच्या खिशात मिळाले होते. त्यात, ज्या माणसाला (मुसळे) मी शिकवून आज प्रशासकीय अधिकारी (एओ) केले आणि चांगला पगार दिला, त्यानेच माझ्यावर खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे मला अतीव दुःख आहे आणि म्हणूनच मी माझे जीवन संपवत आहे, असे म्हटले आहे.
आरोपी मनीषा माने-मुसळे हिला शनिवारी रात्री साडेनऊ वाजता सदर बझार पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, रविवारी तिला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. अटक केल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मनीषा माने-मुसळे हिची विचारपूस केली असता ती समाधानकारक उत्तर देत नाही. तिच्या कृत्यामुळे सोलापुरातील नामांकित डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. तिने अशाप्रकारे आणखी कसा आणि कितीवेळा डॉ. वळसंगकर यांना मानसिक त्रास दिला ? यात तिला कोणाची साथ मिळाली आहे, याचा तपास करण्यासाठी आरोपी मनीषा माने-मुसळे हिला तीन दिवस पोलीस कोठडीची मागणी पोलीस तपास अधिकारी तथा सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी केली.
न्यायदंडाधिकारी दीपक कंखरे यांनी आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. यावेळी सरकारतर्फे ॲड. शिल्पा बनसोडे-सुरवसे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक आणि ॲड. सिद्धाराम पाटील यांनी काम पाहिले.