नितीन पखाले
यवतमाळ
वैमानिक ते अंतराळ झेप अशा विविध क्षेत्रात सारथ्य करणाऱ्या महिलांची क्षमता जगाने वेळोवेळी बघितली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात प्रथमच यवतमाळ आगारात महिला बस चालकांची नियुक्ती करून लालपरीचे सारथ्य महिलांकडे देण्यात आले होते. हाच प्रयोग आता यवतमाळच्या पोलीस दलातही करण्यात येत आहे. त्यासाठी ११ महिला पोलीस शिपायांची निवड करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षणही पार पडले. त्यामुळे पोलीस दलातील वाहनांचे ‘स्टिअरिंग’ लवकरच या महिला चालकांच्या हाती येणार आहे. सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. पोलीस विभागातील महिला कर्मचाऱ्यांनाही पुरूष सहकाऱ्यांप्रमाणे वाहने चालविता यावी, यासाठी जिल्हा पोलीस दलातही महिलांना पोलीस वाहनांवर चालक म्हणून नेमण्याची कल्पना येथील जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पूर्णत्वास नेली. महिलाही पुरूषांपेक्षा काही कमी नाहीत, हा संदेशच त्यांना समाजात आणि पोलीस दलात या निमित्ताने दिला.
मुंबई, नागपूर आदी शहरात पोलीस विभागात महिला वाहन चालकांना संधी देण्यात आली आहे. यवतमाळच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही या आव्हानात्मक करिअरची संधी दिली पाहिजे यासाठी पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही कल्पना सूचविली. त्याला महिला कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील १५ महिला कर्मचारी पोलीस वाहनांचे सारथ्य करण्यासाठी पुढे आल्या. प्रांरभी काही महिला कर्मचाऱ्यांना भीती आणि हे काम आपण करू शकणार की नाही याबबात चिंताही वाटत होती. वरिष्ठांनी त्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना प्रोत्साहन दिले. १५ पैकी ११ महिला कर्मचारी चालक प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या. या सर्व कर्मचाऱ्यांना पुणे जिल्ह्यातील औंध पोलीस प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. तेथे त्यांनी हलके आणि जड या प्रकारातील वाहन चालविण्याचे आणि अन्य तांत्रिक बाबींचे धडे गिरविले. सोबतच वाहतूक नियमांचेही ज्ञान आत्मसात केले. या अकराही महिला कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. आता त्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या मोटर वाहन विभागात रूजू झाल्या आहेत. आगामी सर्वसाधारण बदल्यांमध्ये या कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील वाहनांवर चालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
वाहन चालक झालेल्या या अकरा रणराणिनींमध्ये यवतमाळ पोलीस दलातील अश्विनी कंठारे, बबीता राठोड, प्रिया मुंदेकर, शुभांगी डेहणकर, माला वानखडे, अल्का कांबळे, बिंदू जोगळेकर, दीपाली भेंडारे, निशादबी पठाण, शिवाणी शिंदे आणि पूजा बन्सोड यांचा समावेश आहे. कुठलेही काम हे कमी अथवा उच्च दर्जाचे नसते. नेहमीच्या कर्तव्यापेक्षा वाहन चालकाची म्हणून जबाबदारी अधिक आहे. शिवाय यात जोखीमही अधिक आहे. परंतु, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विश्वास टाकल्याने आमचाही आत्मविश्वास वाढला. आव्हान म्हणून हे काम स्वीकारले. आम्ही पोलीस वाहनांचे सारथ्य यशस्वीपणे करू असा विश्वास या महिला वाहन चालकांनी व्यक्त केला.