सहकार आणि राजकीय चळवळीत सरंजामशाहीने प्रवेश केल्याने लोकशाही बरोबर स्व.यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचाही पराभव झाला असून, अभिसरणाची सामाजिक संस्कृती जोपासणा-या महाराष्ट्रात आता सामाजिक दहशतवादाने समाजाला अपमानित करण्याची परंपरा सुरू झाली असल्याची खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी व्यक्त केली. सोनई, जामखेड येथील घटनांची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्या वतीने अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन प्रवरानगर येथील डॉ.धनजंयराव गाडगीळ सभागृहात करण्यात आले होते. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना डॉ.विखे बोलत होते. नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठय़ा संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.
राज्याचे कृषी व पणनमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार नंदकुमार झावरे, सुभाष पाटील, नगर मनपाच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर, प्रा.श्रीकांत बेडेकर, पायरेन्सचे अध्यक्ष एम.एम पुलाटे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते विखे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विखे म्हणाले, की सोनई, जामखेड तसेच राज्यातील अनेक घटना पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला न शोभणा-या आहेत. या घटनांची चौकशीही होत नाही व यातील आरोपींना शिक्षा होत नाही हे दुर्दैव असून या घटनांची सीबीआय चौकशी करावी .या घटना कुणाच्या तरी वरदहस्ताने होतात किंवा नंतर त्याला राजकीय वरदहस्त मिळतो. परंतु त्यात बळी गेल्याचा नंतर कोणीही विचार करीत नाही.
पद्मश्री डॉ.विखे पाटलांचा उल्लेख करून ते म्हणाले, की सावकारांच्या आणि भाऊबंदकीच्या विरोधात चळवळ उभी केल्यानेच सहकाराचा जन्म होऊ शकला या चळवळीत तुम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित राहिलात म्हणूनच सहकाराचे वैभव उभे राहिले. राज्यात भाऊबंदकी वाढली, जाितपातीचे मेळावे सुरू झाले.निवडणुकाही जातीच्या आधारावर लढल्या जाऊ लागल्याने लोकशाही बरोबरच स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचाही पराभव या राज्यात झाला आहे, असे ते म्हणाले
केवळ दहशतवादाने माणसे जवळ केली जात असल्याचे सांगून डॉ. विखे म्हणाले, की कर्तृत्व हे कामातून ठरते. यातूनच नावलौकिकही वाढतो. सध्या माफियांचे पाऊल सर्व क्षेत्रांत पडल्याने समाज भयभीत झाला आहे. मात्र येणा-या काळात माफियांना पाठीशी घालणा-या राजकारण्यांना जनता सैरभैर करून सोडेल.राजकीय महत्त्वाकांक्षेची भूक भागविण्यासाठी सामाजिक बळी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. श्रीकांत बेडेकर यांनी विखे यांच्या जीवनावर भाष्य करून संघर्षाशिवाय जीवन नाही हे दाखवून देणारे शेतक-यांचे ते एकमेव नेते असल्याचे गौरवोदगार काढले. आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी विखे यांच्या कार्याचा गौरव केला. उमरभाई बेग, दिनकरराव पालवे, पद्मकांत कुदळे, फादर राजेंद्र लोंढे, अण्णासाहेब बाचकर, एस.एन. चतुर्वेदी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी केले तर आभार भास्करराव खर्डे यांनी मानले.
राजकारण व सहकारात सरंजामशाहीचा प्रवेश चिंताजनक-विखे
सहकार आणि राजकीय चळवळीत सरंजामशाहीने प्रवेश केल्याने लोकशाही बरोबर स्व.यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचाही पराभव झाला असल्याची खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-05-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feudal access critical in politics and co operation vikhe