मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि इतर जवळपास ४० आमदार सत्तेत सामील झाले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उर्वरित गटही सत्तेत सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे.
काँग्रेसचे काही आमदार आमच्याकडे येतील, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करत आहोत, असंही ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नारायण राणेंच्या या विधानानंतर विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, इंडिया आघाडीत ३० पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार एकत्र आले तर काय फरक पडणार आहे? ते तिघे होते, तरीही ते काही करू शकले नाहीत. तिघांचे दोघे झाले, तरीही काही करू शकले नाहीत. आता दोघांचे पुन्हा तीन झाले आहेत, पुढे चार होतील. पण त्यामुळे काहीही होणार नाही. आता काँग्रेसचेही काहीजण आमच्याकडे येतील, आम्ही सर्व पक्षाचं सरकार स्थापन करत आहोत.
हेही वाचा- जामिनावर सुटका होताच नवाब मलिक अजित पवार गटात जाणार? छगन भुजबळांचं सूचक विधान
खरं तर, काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांनी पुण्यात गुप्त बैठक घेतली आहे. या बैठकीमुळे शरद पवारांची भूमिका नेमकी काय आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा राजकीय घडामोडी सुरू असताना काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सामील होतील, अशा आशयाचं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. यामुळे राज्यात आणखी एक राजकीय भूकंप येणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जातायत.