पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी तयार करण्यात आलेला डॉ. कस्तुरीरंगन आणि गाडगीळ समितीचा अहवाल उपग्रहचित्रांच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे. या पुढील टप्प्यात आता सात राज्यांमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन जमिनींचे सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम सुरू केला जात आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्य़ांमध्ये हा कार्यक्रम लवकरच सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम घाट अहवालाच्या अनुषंगाने वन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जावेडकर यांनी सोमवारी घेतली. पश्चिम घाट अहवालात नाशिक ते कोल्हापूर या पट्टय़ातील १२ जिल्हे आणि दोन हजार १५६ गावे येतात. त्यासाठीचा अहवाल उपग्रहचित्रांच्या आधारे तयार करण्यात आला. पुढील टप्प्यात प्रत्यक्ष जमिनींची पाहणी केली जाईल. महाराष्ट्रात हे काम करण्याबाबत माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे व लवकरच हे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.
पश्चिम घाटासंबंधी तयार करण्यात आलेल्या या अहवालामुळे स्थानिक लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण झाले असून ते दूर करण्याची गरज आहे. सर्वेक्षण करताना आवश्यक माहिती पोहोचवण्याचे काम वन खात्यामार्फत केले जाईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.

Story img Loader