शांतीनगर परिसरातील एका नामांकित शाळेच्या आवारातच मंगळवारी सकाळी पाचवीच्या विद्यार्थिनीवर अनोळखी मुलाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेने त्या परिसरात खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी शाळेत गर्दी केली. लकडगंज पोलिसांनी आरोपीचा तातडीने शोध करून अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
आज सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास या शाळेचे शिक्षक शाळेत आले. पाचवीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी रडत असलेली त्यांना दिसली. त्यांनी तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून त्यांना धक्काच बसला. शिक्षकांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र उनावणे यांच्यासह लकडगंज पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तातडीने त्या विद्यार्थिनीला मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. हे वृत्त समजताच शाळेसमोर नागरिक व पालकांची गर्दी झाली. पीडित मुलीचे आई-वडीलही तेथे आले. तिचे वडील मजुरी करतात.  पोलिसांनी या विद्यार्थिनीची विचारपूस केली असता तिने मुलाचे वर्णन पोलिसांना सांगितले.
पीडित मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा तातडीने शोध सुरू केला असून तो या परिसरातील असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

Story img Loader