अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा अशा प्रवृत्तींना प्राणपणाने विरोध करून बदला घ्यायला हवा, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला.
आशय सांस्कृतिक, पुणे आणि आर्ट सर्कल, रत्नागिरी यांच्यातर्फे  संयुक्तपणे आयोजित पुलोत्सव कार्यक्रमामध्ये लांजा येथील अक्का तेंडुलकर महिलाश्रम संस्थेला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार कुलकर्णी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी बोलताना, डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन दोन महिने उलटले तरी खुन्यांचा शोध लागलेला नाही, याबद्दल खेद व्यक्त करून कुलकर्णी म्हणाल्या की, या घटनेमागे असलेल्या प्रवृत्ती सध्या समाजात बोकाळल्या आहेत, ही दु:खाची बाब अाहे. दाभोलकरांसारख्या व्यक्तीची हत्या होते आणि आपण काही करू शकत नाही, या असाहाय्यतेच्या जाणिवेने रोज सकाळी मला जाग येते, तेव्हा संकोचल्यासारखे होते. आपण सर्वानी विविध प्रकारच्या अंधश्रद्धांना सर्वशक्तीनिशी विरोध करून या हत्येचा बदला घ्यायला हवा.
कुलकर्णी यांच्या हस्ते महिलाश्रम संस्थेला मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख अकरा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. राजीव जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले. संस्थेच्या वतीने अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पूर्वा पेठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पुलोत्सवातील या दुसऱ्या दिवशी या पुरस्कार वितरणापूर्वी कुलकर्णी आणि लेखक-अभिनेते मिलिंद फाटक यांची वीरेंद्र चित्राव यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये दोघांनीही आपल्या कारकिर्दीचा प्रवास कथन केला. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता-गाण्यांवर आधारित ‘माझे जीवनगाणे’ या कार्यक्रमाने दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा