विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजण्यास आतापासूनच सुरूवात झाली आहे. या जागेवर काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही बलाढ्य पक्षांनी दावा सांगितला आहे. यात हे दोन्ही पक्ष आघाडी न करता एकमेकांच्या विरोधात शड्ड ठोकून उभे ठाकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
सध्या या जागेवरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील हे प्रतिनिधित्व करतात. त्यांची मुदत येत्या दोन महिन्यात संपणार असून नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात पाऊस नसल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पाऊस पडावा म्हणून जिकडे तिकडे देवादिकांना साकडे घातले जात असताना विधान परिषदेच्या निवडणुकीत पडणारा ‘अर्थ’पूर्ण पाऊस कसा असेल, त्याचा लाभ आपणांस कसा होईल, याची उत्कंठा या निवडणुकीतील मतदारांना लागली आहे.
या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या एकूण मतदारांची संख्या ३७६ आहे. यापकी काँग्रेस व आघाडीचे सर्वाधिक १६६ मतदार आहेत. तर, राष्ट्रवादी आघाडीच्या मतदारांची संख्या ११२ इतकी आहे. भाजप-सेना युतीचे ५७, तर शेकाप-१४, इतर-१०, अपक्ष-३ व आघाडी-१४ याप्रमाणे मतदारांचे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसने आपल्या मतदारांची संख्या जास्त असूनही आघाडीमुळे राष्ट्रवादीकडे ही जागा कायम आहे.
१९८५ व १९९७ चा अपवाद वगळता सोलापूरच्या विधान परिषदेची ही जागा शरद पवार गटाकडे व पर्यायाने राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली आहे. युन्नूसभाई शेख, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर सध्या दीपक साळुंखे हे ही जागा सांभाळत आहेत. १९८५ साली शरद पवार यांचा पुलोद प्रयोग सुस्थितीत असतानादेखील काँग्रेसचे दिवंगत नेते ब्रह्मदेव माने हे पुलोदचे रंगलाल तोष्णीवाल यांचा धक्कादायक पराभव करून निवडून आले होते. नंतर १९९७ साली भाजपची ताकद नगण्य असतानासुध्दा या पक्षाचे सुभाष देशमुख यांनी ‘देशमुख पॅटर्न’ राबवून शरद पवार यांचे विश्वासू युन्नूस शेख यांचा धक्कादायक पराभव केला होता.
ही जागा गेली १२ वष्रे राष्ट्रवादीकडे असली तरीही यंदा मात्र त्यावर मतदारांची जास्त संख्या विचारात घेऊन काँग्रेसने दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे जागा लढविण्याच्या असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीकडून अजितनिष्ठ विद्यमान आमदार दीपक साळुंखे हे पुनश्च संधी मिळण्यासाठी आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. तर, काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांचे नाव पुढे आले आहे. इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चच्रेत असले तरी त्यांना पसंती मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनीही उमेदवारीसाठी मोच्रेबांधणी चालविली आहे. यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसमधूनच इच्छुकांची संख्या अधिक दिसून येते. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारही तेवढ्याच ताकदीचा असावा लागतो. त्यादृष्टीने माजी आमदार दिलीप माने हे तगडे उमेदवार ठरू शकतात. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसह ब्रह्मदेव माने सहकारी बँक, दोन साखर कारखाने, अभियांत्रिकी महाविद्यालय असे संस्थात्मक जाळे हातात असलेले दिलीप माने हे २००९ साली विधानसभेवर निवडून गेले होते. राजकीय मुत्सद्देगिरीत ते पुढे असतात. अलीकडे सोलापूर कृषिबाजार समितीच्या आवारात दिवंगत वडील ब्रह्मदेव माने यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने सभापती दिलीप माने यांनी सुशीलकुमार िशदे, खासदार विजयसिंह मोहिते, शेकापचे गणपतराव देशमुख तसेच डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील यांना एकत्र आणून स्वतची खुंटी बळकट करून घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा