सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमुळे आधीच डोक्यावर टांगती तलवार असताना, पुतण्याच्या करामतीमुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे अडचणीत आले आहेत. सारी पदे घरातच ठेवण्याच्या अट्टहासामुळे तटकरे यांच्यावर ही वेळ आली आहे. त्यातच भाऊ आणि त्यांच्या मुलांची अति महत्त्वाकांक्षा तटकरे यांच्यासाठी तापदायक ठरली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि मुंडे काका-पुतण्यांच्या राजकीय वादानंतर तटकरे काका-पुतण्याचा वाद समोर आला आहे. रोहा नगराध्यक्षपदासाठी तटकरे यांनी आपल्या व्याह्य़ाला उमेदवारी दिल्याने पुतण्याने बंडाचे निशाण फडकविले. तसेच शिवसेनेत प्रवेश करून ठाकरे आणि मुंडे यांच्याप्रमाणेच तटकरे यांच्या पुतण्याने काकालाच आव्हान दिले आहे.

वाद काय आहे?

विधान परिषदेच्या रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाऊ अनिल तटकरे यांना पक्षातील नेत्यांचा विरोध असतानाही दोनदा उमेदवारी देण्यात आली. कन्या आदिती आणि पुत्र अनिकेत यांना राजकारणात पुढे आणण्यावर सुनील तटकरे यांनी भर दिला. पण आमदार बंधू अनिल तटकरे यांची महत्त्वाकांक्षा आड आली. आमदार बंधूचे पुत्र अवधूत आणि संदीप यांनाही पदांचे वेध लागले. बंधू अनिल यांनी भांडून दुसऱ्यांदा आमदारकी पदरात पाडून घेतली होती. भावाच्या पावलावर त्यांच्या दोन मुलांनी पाऊल टाकले. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तटकरे यांनी स्वत:ची विधान परिषदेवर वर्णी लावून मुलीला विधानसभेला उमेदवारी देण्याची योजना आखली होती. पण पुतणे अवधूत अडून बसले. शेवटी पुतण्याचे समाधान करावे लागले. नशिबाने अवघ्या ३५ मताने निवडून येऊन अवधूत आमदार झाले. आमदार बंधूंची पत्नी शुभदा या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांनाही चांगल्या पदाची अपेक्षा होती, पण संधी देण्यात आली नाही. काका आपल्याला पुढे येऊ देत नाही याचा राग आल्यानेच पुतणे संदीप यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करून आता थेट काकालाच आव्हान दिले आहे. रोहा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होणार आहे.

राजकारणातील तटकरे कुटुंब 

  • आमदार अनिल तटकरे (मोठा भाऊ)

सुनील तटकरे यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. अनिल तटकरे यांची व त्यांच्या कुटुंबाची राजकीय महत्त्वाकांक्षा सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीचा मुद्दा राहिला आहे. स्वत: आमदार, मुलगा आमदार, पत्नी जिल्हा परिषद सदस्या असा सारा गोतावळा पदे भोगत असताना आता दुसरा मुलगा शिवसेनेतून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहे.

संदीप तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. योग्य वेळी बोलू असे त्यांनी सांगितले.

  • अनिकेत तटकरे (मुलगा)

सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत राजकारणात फारसा सक्रिय नसला तरी गेल्या काही वर्षांपसून त्याच्या राजकीय कारकीर्दीला दिशा देण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले आहे. अवधूत याच्या नाराजीनंतर अनिकेतला रोह्य़ाच्या राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय  शरीरसौष्ठव स्पर्धेचे रोह्य़ात आयोजन करून अनिकेतचे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला. अवधूतच्या नाराजीनंतर रोहा शहरातील पक्षबांधणीची जबाबदारी अनिकेत तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अनिकेतचे सासरे संतोष पोटफोडे यांनाच राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि पुतणे संदीपने बंडाचे निशाण रोवले.

  • आमदार अवधूत तटकरे (पुतण्या)

आमदार अवधूत तटकरे, तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ. रोह्य़ाचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान आमदार, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व, यामुळे एकेकाळी तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत ओळखले जात होते. त्यांची आक्रमकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हा सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीची ठरली आहे. सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लावून घेतल्यावर आमदारकी आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा उभा दावा करीत अवधूत यांनी काकालाच आव्हान दिले. तेव्हापासूनच तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते. अवधूत यांच्या प्रचारापासून आदिती आणि अनिकेत तटकरे दूर राहिले. आमदार म्हणून निवडून आल्यावर अवधूत याने  रोह्य़ाचे नगराध्यक्षपद सोडणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी नगराध्यक्षपद सोडले नाही. अखेर नगरसेवकांनी त्याच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यामुळे अवधूत तटकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून अवधूत हे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहिले आहेत.

  • शुभदा तटकरे (अनिल तटकरे यांच्या पत्नी)

शुभदा तटकरे या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतिपदावर काम केले आहे. जिल्हा परिषदेवर सध्या शेकाप आणि राष्ट्रवादीची सत्ता असल्याने पदाधिकारी म्हणून काम करता यावे यासाठी त्या आग्रही होत्या. मात्र त्यांना गेल्या अडीच वर्षांत संधी मिळाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पक्षांतर्गत कामकाजात त्या फारशा सक्रिय नसतात.

  • संदीप तटकरे (पुतण्या)

रोहा नगराध्यक्षपदासाठी संदीप यांना उमेदवारी मिळावी यासाठी वडील अनिल तटकरे आणि भाऊ अवधूत  आग्रही होते. मात्र सुनील तटकरे यांनी व्याही संतोष पोटफोडे यांना उमेदवारी दिली. आतापर्यंत चर्चेत असलेला तटकरे यांच्या घरातील वाद जाहीर झाला.

  • आदिती तटकरे (मुलगी)

आदिती तटकरे सुनील तटकरे यांची कन्या, युवती राष्ट्रवादी काँग्रेसची कोकण संघटक, खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय आणि तटकरे यांची राजकीय वारसदार म्हणून आदितीकडे बघितले जाते. महिला बचत गटांच्या माध्यमातून काम श्रीवर्धन मतदारसंघात पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. सुनील तटकरे यांच्या मंत्रिपदाच्या काळात श्रीवर्धन मतदारसंघाची संपूर्ण बांधणी करण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.