भाजपातील अतंर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी जळगावमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गिरीश महाजनही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे रावसाहेब दानवे व्यासपीठ सोडून निघून गेले.

जिल्हाध्यक्षपदासाठी जळगावमध्ये शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. याबैठकीला पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व गिरीश महाजन हे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना अचानक पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला जाऊन कार्यकर्त्यांनी एकमेकांवर शाईफेकही केली. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झालेली असताना रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन व्यासपीठावरच होते. वाद वाढल्यानंतर रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.

आणखी वाचा – …म्हणून आम्ही हा लढा उभारणार; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

दोन गटांपैकी एक गट खडसे समर्थक असल्याचे समजते. थोड्यावेळाने वादावर पडदा पडल्यानंतर बैठकीला सुरूवात झाली. राज्यात सत्तास्थापन झाल्यापासून जळगाव जिल्हा राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांमुळेच झाला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे आपलं तिकीट कापण्यात आल्याचं खडसे म्हणाले होते.

Story img Loader