भाजपा आमदाराच्या दोन पत्नींमध्ये भर कार्यक्रमात मारहाण झाल्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. यवतमाळमधील आर्णी-केळापूरचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नींमध्ये ही मारहाण झाली. १२ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. सुरुवातीला दोन्ही पत्नींमध्ये कडाक्याचं भांडण झालं ज्याचं रुपांतर नंतर मारहाणीत झालं. मारहाणीचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी राजू तोडसाम यांच्या दोन्ही पत्नी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळीच दोघींमध्ये वादावादी झाली. पहिली पत्नी असूनही राजू तोडसाम दुसऱ्या पत्नीसोबत राहतात यावरुनच या भांडणाला सुरुवात झाली होती. नंतर याचं पर्यवसन हाणामारीत झालं.

राजू तोडसाम यांनी पहिली पत्नी असतानाही भाजपाच्या कार्यकर्त्या असणाऱ्या प्रिया यांच्याशी दुसरं लग्न केलं. गेल्या काही वर्षांपासून ते दुसरी पत्नी प्रियासोबत राहत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिलेला नाही. यामुळे त्रस्त असणाऱ्या पहिल्या पत्नीने नातेवाईकांसह कार्यक्रमस्थळ गाठलं आणि भांडण सुरु केलं. यानंतर दोघींमध्ये हाणामारी झाली.

भांडण सुरु असताना कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्यांनी एकच गर्दी केली. यावेळी काहीजणांनी हा प्रकार मोबाइलमध्ये शूट केला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी काही कारवाई करण्यात आली की नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

 

Story img Loader