गोंदियातील दांडेगाव ग्रामपंचायत येथील महिला सरपंच व पुरुष उपसरपंचात मंगळवारी हाणामारी झाली. या मारहाणीची माहिती समजताच महिला सरपंचाच्या पतीनेही उपसरपंचाला मारहाण केली असून यात उपसरपंचाला गंभीर दुखापत झाली आहे.
सोमवारी गोंदियातील विश्रामगृहात दांडेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच हिरामण बावणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला सरपंच बेबीनंदा चौरे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह ग्रामपंचायत चालवताना अरेरावी करत असल्याचा आरोप केला होता. या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महिला सरपंच बेबीनंदा चौरे यांनी उपसरपंच हिरामण बावणकर यांना जाब विचारला. हा वाद चिघळला आणि बेबीनंदा यांनी उपसरपंचाला मुस्कटात मारली. यानंतर उपसरपंच हिरामण बावणकर यांनीही महिला सरपंचाला मारहाण केली.
मारहाणीचे वृत्त गावात पसरताच तणाव निर्माण झाला.बेबीनंदा यांचे पती विनोद चौरे यांनी उपसरपंच हिरामण यांना मारहाण केली. यात उपसरपंच हिरामण बावणकर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना गोंदियातील के.टी.एस. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.