माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाने राज्याचेच नव्हे तर देशाच्या राजधानीचेही लक्ष वेधून घेतले. त्याआधी तब्बल तीन आठवडे त्यांच्या उमेदवारीवर माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. ती नकारात्मक होती. तरीही काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांच्याविरुद्ध भाजपाने माजी खासदार डी. बी. पाटील यांना उमेदवारी दिली असून आता निवडणूक रिंगणात २३ जण असले तरी खरी लढत अशोक चव्हाण विरुद्ध ‘महायुती’ अशीच आहे.
नांदेड मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ असून त्या ठिकाणी स्वत: अशोक चव्हाण (भोकर) यांच्यासह काँग्रेसचे आमदार प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असावे. आमदार-पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी नांदेडची जागा पक्षाकडे राखायची असेल तर यंदा अशोकरावांना उभे केले पाहिजे, असा आग्रह धरला होता. त्यावरील गुऱ्हाळ बरेच दिवस चालल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनाही तो मान्य करावा लागला. चव्हाण यांचे राजकीय पदार्पण १९८७ मध्ये खासदारकीनेच झाले होते. पण १९८९ मध्ये त्यांचा नवख्या उमेदवाराकडून अनपेक्षित व तितकाच धक्कादायक पराभव झाला होता. ‘त्या’ पराभवाचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असताना ते ‘गोदातीरा’वरून यमुनेच्या तीरावर जाण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी नावेत बसले आहेत.
१९८९ मध्ये नांदेडात एक ‘प्रयोग’ झाला होता. चव्हाणांविरुद्ध प्रमुख विरोधकांनी एकत्र येऊन डॉ. व्यंकटेश काब्दे यांना उभे केले होते. हा प्रयोग तेव्हा यशस्वी झाला होता. यंदाही ‘एकजूट’ करून त्यांच्याविरुद्ध तसा प्रयोग करता आला असता; पण चव्हाणांची उमेदवारी जाहीर होताच पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे उमेदवार उगवले. अर्ज दाखल केलेल्यांची संख्या ७० वर गेली होती. ती २३ पर्यंत खाली आणण्यासाठी शेवटी काँग्रेसलाच खटपटी, विनवण्या कराव्या लागल्या. भाजपाने डी. बी. पाटील यांना अचानक पावन करून घेत उमेदवारीचा नजराणा दिला. या पक्षाची निश्चित मते ३ लाखांच्या आसपास आहेत. नरेंद्र मोदींच्या लाटेचा विचार करून पक्षाने डी. बीं.च्या माध्यमातून ‘मराठा कार्ड’ मैदानात टाकताना त्याला काही प्रमाणात ‘घडय़ाळा’ची साथ मिळेल, असे गृहीत धरले आहे. पण जिल्ह्य़ाच्या राजकारणात अशोक चव्हाण नेहमीच ‘राष्ट्रवादी’ला पुरून उरले असल्याने काँग्रेसला ती चिंता वाटत नाही.
२००९ मध्ये भास्करराव खतगावकर जे अजिबात लोकप्रिय नव्हते ते पाऊण लाखांनी विजयी झाले होते. आता ‘साहेब’च उमेदवार असल्याने मतदानाची टक्केवारीही वाढेल आणि अशोक चव्हाण मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील, असा दावा पक्षाच्या आमदारांकडून केला जात आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी नाही, कोणाचा रुसवा नाही. यंत्रणा आणि निवडणूक साधनांची कमतरता नाही. भाजपात मात्र या उलट स्थिती असल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदींनी सभेमुळे पक्षातली मरगळ दूर झाली असली तरी त्यांच्या सभेमुळे निर्माण झालेले वातावरण दोन आठवडे टिकवून ठेवण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.
मागील तीन-चार वर्षे चव्हाण यांच्यामागे ‘आदर्श’सह अनेक कटकटींचा ससेमिरा होता. तरी पक्षनिष्ठा कायम ठेवत ते जिल्ह्य़ाच्या पातळीवर, स्थानिक निवडणुकांत ‘रणजोडदास’ राहिले. त्यांनी पक्षाची राजकीय शक्ती वाढविली. त्यांच्या विरोधातील डी. बी. मात्र २००९ मध्ये खासदार असताना उमेदवारी नको म्हणत ‘रणछोडदास’ झाले होते. येथे डॉ. हंसराज वैद्य (बसपा) आणि बालाजी शिंदे (सपा) किंवा नरेंद्रसिंघ ग्रंथी (आप) हेही उमेदवार असले तरी खरी लढत ‘रणजोडदास’ विरुद्ध ‘रणछोडदास’ अशीच आहे.
सांभाळून घ्या, मी तुमचाच – डी. बी.
भाजपातल्या इतर इच्छुकांना बाजूला सारून डी. बी. पाटील यांनी उमेदवारीची शर्यत त्यात भाग न घेताच जिंकली. देशात मोदींचे वारे आहे. आपल्याला त्यांना पंतप्रधानपदी बघायचे असल्याने सांभाळून घ्या, असे आवाहन डी. बी. पाटील यांनी केले. मी तुमचाच आहे, असेही त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटले.
ना लाट, ना वारे – अशोक चव्हाण
नांदेडसह आजूबाजूच्या तीन मतदारसंघांमध्ये मोदी यांची ना लाट आहे, ना वारे. आम्ही मतदारसंघाची घट्ट बांधणी केली असल्याने सुज्ञ मतदार दलबदलूंच्या मागे न जाता काँग्रेसच्या आश्वासक धोरणांची पालखी वाहतील, असा विश्वास अशोक चव्हाण यांना वाटतो.
‘रणजोडदास’ विरुद्ध ‘रणछोडदास’ यांच्यात लढत!
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाने राज्याचेच नव्हे तर देशाच्या राजधानीचेही लक्ष वेधून घेतले. त्याआधी तब्बल तीन आठवडे त्यांच्या उमेदवारीवर माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली.
First published on: 31-03-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight in ranchoddas against ranchhoddas