संत सदगुरु सीतारामबाबा उंडेगावकर यांच्या निधनानंतर त्यांचा समाधी सोहळा कोठे करायचा यासाठी खर्डा (ता. जामखेड, जि. नगर) व उंडेगाव (ता. भूम, उस्मानाबाद) या दोन गावात व तेथील भक्तगणांत संघर्ष निर्माण झाला आहे. हा वाद दोन दिवसानंतरही न मिटल्याने दोन्ही ठिकाणच्या भाविकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच आज, रविवारी खर्डा येथे हजारो भाविकांनी चार ते पाच तास रास्ता रोको केले. सध्या सीतारामबाबांचे पार्थिव पुण्यातील रुबी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे.
सीतारामबाबांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात उपचार सुरु असताना निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आजारपणामुळे आठच दिवसांपूर्वी त्यांना खर्डाच्या ग्रामस्थांनी उपचारासाठी प्रथम बार्शी (सोलापूर) येथे व नंतर अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने २६ ऑगस्टला पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाबांचा नगरसह मराठवाडय़ात मोठा भक्तगण आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी पुण्यात धाव घेतली. खर्डा व परिसरातील ग्रामस्थांनी बंद पाळला. गेल्या दोन दिवसांपासुन गावात चुली पेटल्या नाहीत. बाबांचा गड खर्डा येथे असल्याने त्यांचा समाधी सोहळा खर्डा येथेच व्हावा, यासाठी ग्रामस्थ आग्रही आहेत.
पुण्यात पोहोचलेले उंडेगावचे ग्रामस्थही समाधी सोहळा उंडेगावला होण्यासाठी आग्रही आहेत. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे व कर्जत-जामखेडचे आमदार राम शिंदे हेही पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. अनेकांनी पुण्याचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडेही दाद मागितली आहे. उंडेगावचे ग्रामस्थ बाबांनी सन २०११ मध्ये केलेल्या मृत्युपत्राचा आधार घेत आहेत. बाबांनी त्यात उंडेगावला अंत्यविधी करावा, असे नमूद केले होते. तर खर्डा ग्रामस्थांच्या मतानुसार १८ जुलै २०१४ मध्ये बाबांनी अॅड. सुधीर झरेकर यांच्या समक्ष केलेल्या मृत्यूपत्रात खर्डा येथेच अंत्यविधी करावा असे नमूद केले आहे. हे शेवटचे मृत्यूपत्र असल्याने तेच खरे असल्याचा दावा केला जात आहे.
याच मागणीसाठी खर्डातील सर्वपक्षीय व धर्मीय भाविकांनी रविवारी सकाळपासूनच रस्ता रोको आंदोलन सुरु केले. ते तब्बल पाच तास चालले, दुपारी एकच्या सुमारास ते मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्यावर दोन किमी. रांगा लागल्या होत्या. रास्ता रोकोतील भाविकांनीच वाहनात खोळंबलेल्या प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या व बिस्किट पुडे दिले.
दरम्यान बाबांच्या पार्थिवावर दोन गावांनी हक्क सांगितल्याने पार्थिव सुरक्षेच्या कारणास्तव रुबी रुग्णालयाच्या शवागारात ठेवल्याचे कांतीलाल खिंवसरा यांनी सांगितले. पार्थिव ताब्यात मिळण्यासाठी, उद्या, सोमवारी पुण्यातील न्यायालयात अॅड. सुदाकर आव्हाड यांच्यामार्फत दावा दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीमुळे खर्डामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, तहसीलदार प्रदीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक शशिकांत वाखारे खडर्य़ात उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा