मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, आज भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीतील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ हे देखील आक्रमक झाले होते. दरम्यान महाविकास आघाडीकडून लोणावळ्यात ओबीसी मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विजय वडेट्टीवार यांनी आपली भुमिका मांडली.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राजकीय पक्ष आंदोलन शक्ती मिळवण्यासाठी करतात, पक्षाची ताकद वाढावी म्हणून करतात. मात्र सामाजिक संघटना जे आंदोलन करतात ते समाजासाठी करतात. त्यामध्ये विश्वासहार्यता असते. आम्ही किती आंदोलने केली भाजपाच्या विरोधात आंदोलने केली. पण वडेट्टीवार काँग्रेसची भुमिका मांडतात हाच त्याचा अर्थ निघेल. तसेच भाजपाने आंदोलने केली तर काँग्रेस विरोधात आहे राष्ट्रवादी विरोधात आहे, हा त्याचा अर्थ निघेल. म्हणून पक्षाच्या पलिकडे जाऊन हा विषय चर्चेला आणायला पाहिजे. एकामेकांकडे बोटे बाखवून मार्ग निघणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ तेव्हा आरक्षणाचा प्रश्न किंवा इतर प्रश्न असतील ते मार्गी लागतील, असा सल्ला वडेट्टीवार यांनी यावेळी विरोधकांना दिला.

हेही वाचा- “ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन”

भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन

नागपुरमध्ये देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. असा देखील त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला. याचबरोबर, पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसीच आरक्षण परत आणू शकतो. मी तर सांगतो, खऱ्या अर्थाने आमच्या हाती जर सूत्र दिली. तर मी दाव्याने सांगतो, ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय सन्यास घेईन, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

Story img Loader