पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावाजवळून वाहणा-या भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणा-या बोटचालकाने शेतक-यास मारहाण केल्याने ग्रामस्थांमधून संताप निर्माण होऊन त्यांनी एक जेसीबी, तीन टिपर, वाळू उपसा करणारी बोट आणि १५ ते २० दुचाकी गाडय़ा पेटवून दिल्या. वाळू उपसा करणारे आणि ग्रामस्थ यांच्यात मारामारी झाली. रात्री उशिरा सुमारे ४० जणांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेळवे नदीपात्रातील वाळूचा लिलाव झाला असून याचा ठेका कोल्हापूर येथील एका एजन्सीने घेतला असून, यात पंढरपुरातील काहींनी टक्केवारीत भागीदारी घेतली आहे. ज्या गटाचा लिलाव झाला त्याचा परवाना असताना तो सोडून दुस-याच बाजूने वाळू उपसा चालू होता. याबाबत तक्रारी दिल्या होत्या. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने गावक-यांनी शेतीचे आणि रस्त्याचे नुकसान होते. हा त्रास सहन न झाल्याने ठेकेदाराचे भागीदार आणि ग्रामस्थ यांच्यात मोठा उद्रेक होऊन आणि गावक-यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने पंढरीतील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलावून घेतले, परंतु गावक-यांनी या ठेकेदार, भागीदाराने आणलेले गुंड यांनाच जबर चोप देऊन पळवून लावले. सध्या शेळवेत वातावरण तंग असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सध्या पंढरीत मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा तोही प्रमाणापेक्षा अधिक सर्व अटी व नियम हे हात ओले करून धाब्यावर बसवून चालू आहे. काही जण तर बनावट पावत्यांचा वापर करून वाळू उपसा आणि वाहतूक करत आहेत. यावर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे वाळू तस्करी मोठय़ा प्रमाणात चालू आहे. वाळूची चोरून वाहतूक करून काहींनी वाळूत हात ओले करून त्या जोरावर गुंडगिरी चालू केली आहे. प्रयत्ने रगडिता वाळूचे कण तेलही गळे या म्हणीप्रमाणे उलट प्रमाणापेक्षा आणि चोरटय़ा मार्गाने वाळू उपसता उपसता पैसाच पैसा मिळे अशी अवस्था वाळूबाबत पंढरीत झाली आहे. मिळेल त्या मार्गाने मिळेल तेथून वाळूचा उपसा चोरटय़ा प्रमाणातही चालू आहे. सायंकाळी सातनंतर कडकपणे वाळू उपशाला नियमाने बंदी असताना राजरोजपणे रात्रीही वाळूचे ट्रक भरून जाताना दिसून येतात. बंदी घालणे गरजेचे असून असे झाले नाहीतर पंढरीत मोठा अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही.

Story img Loader