राज्यभरात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा केला गेला. थर रचताना काही ठिकाणी अनेक गोविंदा जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, बुलडाण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चाने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा- “आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला!
हाणामारीत एक गोविंदा जखमी
या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाला आहे. श्वेता महालेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा जमले होते. डॉल्बीच्या धुंदीत नाचताना जमावाने अचानक एका गोविंदाला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. ही मारहाणीचे नेमके कारण अद्याप कळाले नाही.
हेही वाचा- Dahi Handi 2022 : मुंबईत दीडशेहून अधिक ‘गोविंदा’ जखमी; २३ जण रुग्णालयात दाखल
घाईघाईत दहीहंडी फोडली
मिळालेल्या माहितीनुसार दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक वादाला सुरुवात झाली. यानंतर जमावाने या युवकाला तीन मिनिटं बेदम मारहाण केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे पोलिसांनी एवढ्या गर्दीमध्ये जाऊन तरुणाला लवकर वाचवणं शक्य झालं नाही. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हा वाद शांत झाला. मात्र, घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. अखेर घाईघाईत दहीहंडी फोडण्यात आली आणि हा कार्यक्रम संपविण्यात आला.