मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी सोनई येथे हाणामा-याचे गालबोट लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विशाल नवनीत सूरपुरिया यांच्यात मारामारी झाली. मारहाणीत गावठी कट्टा दाखवून धमकावण्यात आले. पोलीस ठाण्यात या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेचा अपवाद वगळता अन्यत्र मतदान शांततेत झाले. ७४ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुळा कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज १६ हजार २२३ मतदारांपैकी १२ हजार ४२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. २१ जागेसाठी होणा-या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सहकार मंडळाचे उमेदवार व विद्यमान संचालक जबाजी फाटके हे यापूर्वीच निवडून आले आहेत. २० जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. सहकार मंडळाने सर्व जागांवर तर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या शेतकरी विकास मंडळाने १४ उमेदवार उभे केले होते. २४ मतदानकेंद्रांवर आज मतदान झाले. गटनिहाय एकूण मतदार व झालेले मतदान पुढीलप्रमाणे- सोनई २९१० (२२३९), घोडेगाव २९२५ (२०८७), खरवंडी ३००४ (२२७०), नेवासे २३७४ (१७२१), प्रवरासंगम २५१३(१९११), करजगाव २४९७ (१७१४).
आज नेवासे येथील मतदानकेंद्रावर गडाख व मुरकुटे समर्थकांत वादावादी झाली. या वेळी प्रशांत गडाख व आमदार मुरकुटे यांनी संयमाची भूमिका घेत दोन्ही कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र सोनई येथे मतदान संपण्यापूर्वी अर्धा तास मारहाणीची घटना घडली. आमदार मुरकुटे यांच्या शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते विशाल नवनीत सूरपुरिया, प्रफुल्ल नवनीत सूरपुरिया व अनिल शेटे यांना सहकार मंडळाचे कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी विशाल सूरपुरिया यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, निवडणुकीत विरोधी प्रचार करतो म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून डोक्याला गावठी पिस्तूल लावले. तसेच सोन्याची चेन व गॉगल चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून राजेंद्र गुगळे, एकनाथ गडाख, राजेंद्र गडाख, उदय पालवे, जालिंदर चांदघोडे, दादा वैरागर, अनिल दरंदले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद दीपक रावसाहेब धनवटे यांनी नोंदविली असून मी शनिशिंगणापूरहून सोनईकडे येत असताना कमानीनजीक प्रफुल्ल सूरपुरिया याने मला अडवून शिवीगाळ केली. प्रफुल्ल जाधव याने गावठी कट्टा लावून दहा हजार रुपये काढून घेतले. मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल सूरपुरिया, प्रफुल्ल सूरपुरिया, संतोष तेलोरे, सागर गव्हाणे, प्रकाश शेटे, अनिल शेटे, लक्ष्मण कुसळकर, अशोक आगळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा