बेळगावातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील व समाजवादी कार्यकर्ते ॲड. राम आपटे यांचे आज पहाटे निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. सीमा चळवळीतील अग्रणी लढवय्या, सच्चा कार्यकर्ता हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.
त्यांनी आपली संपूर्ण हयात सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खर्ची घातली . सीमा प्रश्नाचा संपूर्ण इतिहास मांडणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहिले होते सध्याच्या परिस्थितीत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी या पुस्तकाची मोलाची मदत होणार आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून व्यापक कार्य केले होते. कामगारांचे प्रश्न सोडवणुकीसाठी त्यांनी अखंड लढा दिला होता. त्यामुळे ते कामगार नेते म्हणूनही परिचित होते. त्यांच्या निधनामुळ बेळगावातील सीमा बांधवांचा सच्चा कैवारी हरपला आहे.
सुप्रीम कोर्टात, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या न्यायालयीन कामकाजाचे ते समन्वयक होते. तळागाळातील लोकांची सेवा करण्यासाठी, स्वतःची जमा पुंजी रु. ५० लाख दान करून त्यांनी ‘जीवनविवेक प्रतिष्ठान’ ही सामाजिक विश्वस्त संस्था स्थापन केली.
अन्याय निवारण मंच, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शोषण मुक्ती दल, जीवन शिक्षण प्रतिष्ठान, अशा बेळगावतील अनेक सामाजिक संस्थांचे ते संस्थापक व आधारस्तंभ होते. राम आपटे यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले.