|| महेश बोकडे
महाराष्ट्रातून केवळ नागपूर जिल्ह्य़ाची निवड
देशातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्रासह पाच राज्यातील प्रत्येकी एका जिल्ह्य़ामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पानुसार या जिल्ह्य़ातील प्रत्येक नागरिकांना हत्तीरोग नियंत्रणासाठी दिल्या जाणाऱ्या पारंपरिक औषधांसह प्रथमच ‘आयवर मेक्टीन’ हे नवीन औषध दिले जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुढे तो देशभरात राबवला जाणार आहे.
केंद्र सरकारने पथदर्शी प्रयोगासाठी निवडलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंडसह महाराष्टाच्रा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ नागपूर हा एकच जिल्हा आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पथदर्शी प्रयोगानुसार या सर्व जिल्ह्य़ांमध्ये नागरिकांना त्यांच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतू नष्ट करण्यासाठी पूर्वी दिल्या जाणाऱ्या अलबइन्डा झोल आणि डीईसी या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्यांसह आयवर मेक्टीन हे नवीन औषध दिले जाणार आहे.
या प्रयोगाअंतर्गत नागपूर जिल्ह्य़ातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण ५१ लाख नागरिकांपैकी तब्बल ४४ लाख नागरिकांना डिसेंबरमध्ये ही औषधे दिली जातील. मात्र हृदयरुग्ण, मूत्रपिंडासह इतर गंभीर आजारांच्या गटात मोडणाऱ्या रुग्ण, गर्भवती महिलांना यातून वगळण्यात आले आहे. या उपक्रमासाठी महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला स्वतंत्र पथके नियुक्त करण्याची सूचना मिळाली आहे. हे पथक घरोघरी जाऊन वजन, उंची तपासून नागरिकांना औषध देणार आहे. सोबत या गोळ्या सेवन केलेल्या सर्व नागरिकांच्या नोंदीही ठेवण्यात येणार आहेत. या पथदर्शी प्रकल्पासाठी ग्लोबल हेल्थ, पीसीआयसह इतरही सामाजिक संस्थांची मदत केंद्रीय व राज्याच्या आरोग्य खात्याला मिळत आहे.
हत्तीरोग कसा होतो?
हत्तीरोग हा जंतासारख्या एका विशिष्ट परजीवीमुळे होणारा आजार आहे. या परजीवीचा प्रसार क्युलेक्स या डासामुळे होतो. हा डास गटार, सांडपाणी, अशा ठिकाणी मुख्यत्वे वाढतो. मात्र, असे पाणी नसल्यास तुलनेने स्वच्छ पाण्यातही तो वाढू शकतो. या डासाच्या चाव्यातून हत्तीरोगाचे जंतू मानवाच्या रक्तात प्रवेश करतात. तेथे त्यांचे रूपांतर मोठय़ा कृमीमध्ये होते. यातील मादी वारंवार नव्या पिलावळीला जन्म देते. एकदा शरीरात शिरलेला हा प्रौढ कृमी शरीरात पाच ते आठ वर्षे, तर क्वचित पंधरा वर्षेदेखील राहू शकतो. हा बाल कृमी दिवसा फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये तर रात्री मुख्य रक्तप्रवाहामध्ये सापडतो. हत्तीरोगावर नियंत्रणासाठी मानवाच्या शरीरातून हे कृमी व जंतू कायमचे नष्ट करणे गरजेचे आहे.
‘‘केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी नागपूरसह देशातील पाच राज्यांत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यात नवीन औषध पहिल्यांदाच वापरले जाणार आहे. हे औषध सुरक्षित असून त्याच्या दर्जाबाबत सर्व तपासण्या झाल्या आहेत. पुढे हा प्रयोग देशभरात राबवला जाणार आहे.’’ – डॉ. संजीव कांबळे, आरोग्य संचालक, मुंबई.