जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासांत गुन्हा दाखल केला नाही तर वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर महाआरती केली जाईल असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहरी होता असं वक्तव्य केलं. त्यानंतर आता भाजपा आक्रमक झाली आहे तर अजित पवार गटानेही जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आता या प्रकरणी थेट इशाराच दिला आहे.
काय म्हटलं आहे आनंद परांजपे यांनी?
“जितेंद्र आव्हाड हे स्वतःला इतिहासाचे संशोधक मानतात. त्यांनी प्रभू रामचंद्राविषयी अभद्र वक्तव्य केलं आहे. प्रभू श्रीराम मांसाहार करत होते. १४ वर्षे राम वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्हीही मांसाहार करतो असं त्यांनी म्हटलं. मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे जे प्रभू रामाची महाआरती करायला गेले होते. मी पोलिसांचाही निषेध करतो, कारण त्यांनी आंदोलन केलं नाही तर महाआरती केली. जितेंद्र आव्हाड कायमच हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. आता पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला नाही तर वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर महाआरती करणार आहोत.” असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
विरु वाघमारे कुठल्या समाजातून येतो?
सनातन धर्माच्या विरोधात, हिंदू धर्माच्या जितेंद्र आव्हाड बोलत असतात. विरु वाघमारे कुठल्या समाजातून येतो? माझा कार्यकर्ता विरु वाघमारे प्रभू रामाची आरती करायला गेला होता. ज्या कार्यकर्त्यांनी ती जागा गोमुत्राने स्वच्छ केली त्यांच्या बुद्धिची मला कीव करावीशी वाटते, तसंच जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धिचीही मला कीव करावीशी वाटते. त्यांची मानसिकता हिंदू धर्माचा अपमान करणं हीच आहे. धर्मनिरपेक्षता याला म्हणत नाही. प्रत्येक धर्माचा मान ठेवणं हे धर्मनिरपेक्षतावाद सांगतो. मात्र आव्हाड कायम हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. जर २४ तासांत FIR दाखल झाला नाही तर आम्ही मोठा मोर्चा घेऊन वर्तक नगर पोलीस स्टेशनवर येऊ. पुढची महाआरती पोलीस स्टेशनच्या समोर केली जाईल असंही आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य काय?
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले होते.