ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत विविध विधानं केली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबतचं पत्रही शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले, “११ तारखेनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमातून आणि ‘सामना’ वृत्तपत्रातून अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. नाशिकला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘हे सरकारचं वैध नाही, त्यांचे आदेश मानू नका’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. विधानसभा अध्यक्ष आमच्याकडेच वकिली करत होते. त्यांना यातलं काहीही कळत नाही. त्यांनी चुकीचा निर्णय दिला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी अनेक वक्तव्यं केली. या वक्तव्यांमुळे हक्कभंग झाला आहे, असं मला वाटतं.”
हेही वाचा-“१६ आमदार अपात्र ठरणार नाहीत”; अजित पवारांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “पोपट…”
पत्रात नेमकं काय म्हटलं?
महोदय, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसेनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करत असून आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करत आहेत.
भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्ष यांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातदेखील आव्हान देता येत नाही. इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहेत.
हेही वाचा- भरत गोगावलेंची प्रतोदपदी पुन्हा नियुक्ती होणार? विधानसभा अध्यक्षांचं थेट विधान, म्हणाले…
विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाच्या कार्यप्रणालीत कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करत नाहीत किंवा त्यांना कोणत्याही पक्षाची झालर लागलेली नसते. तर ते सर्वच पक्षांचे विधिमंडळातील पीठासन अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर खोटे, बेफाम आरोप करून जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम राऊत करत आहेत. त्यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांवर केले जाणारे आरोप हे त्यांना धमकावण्यासाठी केले जात असून अध्यक्ष पदाची मानहानी केली जात आहे. राऊत यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असून तो हक्कभंग या प्रकारात मोडत असल्याची आमची भावना आहे.