‘आज दुपारी त्यानं शेतात चक्कर मारली होती. जाऊ वाटत नव्हतं तरी गेला. उन्हाळय़ातल्यासारखं कडक ऊन पडलं होतं. जमीन तापली होती. सगळीकडे रेघाटलेले रान दिसू लागले. चौफुल्यावर सरकी डोबून माती ढकलल्याची खूण दिसू लागली. उन्हानं लाहालाहा करीत तो आंब्याच्या झाडाखाली बसला. कडक उन्हं अन् घामानं अंगाला काटे टोचल्यासारखं होऊ लागलं, सहज त्यानं सरकीच्या जागेवर उकरून पाहिलं, तर सरकीला मुंग्या लागल्या होत्या. त्याच्या छातीत धस्स झालं’..
असं अस्वस्थ करणारं शेतकऱ्याचं आयुष्य आणि ग्रामीण भागातील आरक्षणाचं वास्तव चित्रित करणाऱ्या लेखक आसाराम लोमटे यांच्या ‘बेईमान’ कथेवर ‘सरपंच भगीरथ’ हा चित्रपट होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत. विद्रोही जलशाचे लोकशाहीर संभाजी भगत चित्रपटाला संगीत देणार देणार आहेत.  कथेचा नायक भगीरथ ओबीसी समाजाचा. आरक्षणामुळे सरपंचपद मिळाल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या दाहकतेची कथा आता मोठय़ा पडद्यावर चितारली जाणार आहे. दोन वर्षांपूर्वीपासून रामदास फुटाणे एका राजकीय कथेच्या शोधात होते. ‘बेईमान’ ही कथा वाचल्यावर चित्रपट करण्याचे त्यांनी ठरविले. राजकारणातील जात या अंगाने भाष्य करणाऱ्या या कथेवर आधारित असणाऱ्या सरपंच भगीरथची पटकथा विष्णू सूर्या वाघ यांनी लिहिली आहे. ‘सामना’ची निर्मिती आणि ‘सुरवंता’ या चित्रपटानंतर तब्बल १८ वर्षांनी रामदास फुटाणे पुन्हा रुपेरी पडद्यावर नवा प्रयोग करीत आहेत.  या पुस्तकाची पाठराखण करताना प्रसिद्ध लेखक प्रा. रंगनाथ पठारे म्हणतात, उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामसमाजातील कोसळणीच्या कथा ‘इडा पिडा टळो’मध्ये आहेत. त्यांच्या कथांमधील दु:खाच्या स्फोटाचे स्वर आपलं अंत:करण घुसळून टाकतात. या दु:खांच्या मती, रती आणि त्यांची घनता याचं जडत्व आपल्याला खिळवून बांधून टाकतं. ग्रामीण जीवनाचे वास्तव सांगणाऱ्या लोमटे यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशन, ग्रंथगौरव तसेच भरूरतन दमाणी यांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या कथांवर ‘एम. फिल.’चे चार प्रबंध झाले आहेत. पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठांमध्ये या कथा अभ्यासक्रमातही होत्या. या कथासंग्रहातील तीन कथांचा कन्नड भाषेत अनुवाद झाला आहे. ‘इडा पिडा टळो’ या कथासंग्रहात ‘बेईमान’ ही पहिलीच कथा आहे. त्यातील ‘बेईमान’ कथेचा नायक ‘भगीरथ’ आता चित्रपटातूनही पाहायला मिळणार आहे. चित्रपटात तीन गाणी आहेत. आनंद शिंदे, चंदन कांबळे आणि संभाजी भगत यांनी ती गायली आहेत. चित्रपटाची निर्मिती शिवकुमार लाड यांची आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा