जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेले मराठा रेजिमेंटचे कुंडलिक माने यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या गावी अत्यंत भावपूर्ण वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुंडलिक माने यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोक पिंपळगाव बुद्रूकमध्ये जमले होते. ‘कुंडलिक मान अमर रहे’ ‘गली गली मे शोर है, पाकिस्तान चोर है’ या घोषणांनी पिंपळगावचा परिसर दणाणून गेला होता. राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे देखील अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. माने यांच्या पार्थिवाला मुखाग्नि देण्यापूर्वी लष्करातर्फे आणि पोलिसांतर्फे त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
पूंछमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्याशी लढताना सोमवारी रात्री माने यांना वीरमरण आले होते. माने यांच्यासह भारतीय लष्कराचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. माने यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, विवाहित बहीण, पत्नी राजश्री, मुलगा अमोल आणि मुलगी आरती असा परिवार आहे. माने यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Story img Loader