लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
अलिबाग – रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत येथील पुल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. हा पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली तसेच रायगडमधील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. तब्बल ३ वर्षे या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आणि रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत या दोन गावांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील आंबेत पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे आंबेत पुलावरून वाहतूक थांबली. या खाडीत दळणवळणासाठी फेरीबोट ठेवण्यात आली आहे. सुरवातीला वाहनासाठी भाडे आकारले जायचे. त्यानंतर मोफत सेवा देण्याचे ठरले. गेली तीन वर्षे या सावित्री खाडीतून फेरीबोटीमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली.
आणखी वाचा-एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच वेतन मिळणार; १२,५०० रुपये सण अग्रीम रक्कम
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयाना जोडणारा हा पूल बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कारकीर्दीत १९७८ साली उभा राहिला. या पुलामुळे रत्नागिरीतील मंडणगड, दापोली आणि खेड या तालुक्यांसाठी मोठा फायदा झाला. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील दळणवळण सुलभ झाले. हा पूल धोकादायक झाल्याने महाविकास आघाडीच्या काळात त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी तब्बल १२ कोटी रूपये खर्च करून पूलाची दुरूस्ती करण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हा पूल पुन्हा वाहतूकीसाठी खुला केला. परंतु काही महिन्यातच पूल पुन्हा वाहतूकीस धोकादायक बनल्याचे लक्षात आल्याने पुन्हा एकदा या पूलावरून वाहतूक बंद करण्यात आली.
आणखी वाचा-दोन महिन्यांनंतरही राज्याला आरोग्य संचालक नाही, डॉक्टरांमध्ये संताप अन् नैराश्य
पूलावरून वाहतूक बंद असल्याने या ठिकाणी फेरीबोटीच्या मदतीने प्रवासी आणि वाहनांची वाहतूक केली जाते. दुसरीकडे अनेक प्रवासी वळसा घालून महाडमार्गे प्रवास करणे पसंत करतात. पूल वाहतूकीसाठी बंद असल्याने शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत होते. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल असा दावा बांधकाम विभागातर्फे करण्यात आला होता. परंतु तो दावा फोल ठरला.
आतापर्यंत या पुलाच्या दुरुस्तीवर तब्बल २८ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या वाहतूक क्षमतेची चाचणी यशस्वी झाली असून त्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.