रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. जांभळे याला दुपारी अलिबागच्या प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.
जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांमधील वाद संजय जांभळे याच्या अंगाशी आला. जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ साहाय्यक पदावर कार्यरत असणाऱ्या जितेंद्र चिर्लेकर यांना त्याच विभागातील कक्ष अधिकारी आणि गजानन लेंडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी बेदम मारहाण केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापतीच्या दालनात ही मारहाण करण्यात आली. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती दालनात हजर होते. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच आज आपला जीव वाचल्याचे मारहाण झालेल्या चिर्लेकर यांनी काल पत्रकारांना सांगितले होते.
मात्र रात्री उशिरा या प्रकरणी अलिबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करताना, चिर्लेकर यांनी बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी २४ तारखेला फोन करून शिवीगाळ केली होती आणि मारहाण करण्याची धमकी दिली होती अशी तक्रार दिली, तर गजानन लेंडी, नरेश लेंडी आणि नरेश साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जांभळे याच्या दालनात मारहाण केल्याचे पोलिसांना सांगीतले.
या तक्रारीनंतर गजानन लेंडी, नरेश लेंडी आणि नरेश साळुंखे यांच्यासह इतर आरोपींवर शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे, शिवीगाळ करणे, शासकीय कामात व्यत्यय आणणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संजय जांभळे सकाळी अलिबाग पोलीस ठाण्यात स्वतहून हजर झाला, व स्वतला अटक करवून घेतली. दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा तपास सुरू आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांना अटक
रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा
First published on: 27-04-2013 at 04:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finance and construction president sanjay jambhale arrested of raigad district council