नांदेड: अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता मार्च एंडची संपूर्ण देयके ई-कुबेर प्रणाली द्वारेच द्यावीत, असे स्पष्ट आदेश राज्याच्या वित्त विभागाने सर्व जिल्हा कोषागार व अधिनस्त कार्यालयांना ताज्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. दरम्यान शनिवारी आणि रविवारी तसेच सोमवारी रमजान ईदची सुट्टी असली तरी कोषागारे व बँका कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक वर्ष संपताना दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूरक मागण्या तसेच सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो. सदर निधी दिनांक ३१ मार्च अखेर खर्च करणे सर्व संबंधितांना बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा कोषागार तसेच उपकोषागार कार्यालयांत या महिन्यात सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत मोठी वाढ होते. परिणामी ट्रेझरी नेट, बिम्स, बिल पोर्टल, सेवार्थ व ग्रास इत्यादी प्रणालीवर ताण येऊन त्याची खूप गती मंदावते. त्यामुळे देयकांची तपासणी करण्यासाठी संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. याशिवाय उपकोषागार कार्यालय स्तरावर रात्री उशिरा सादर होणारी देयके बँकेच्या कामकाजाच्या वेळांमुळे पारित करता येत नाहीत.

यावर्षी मार्च अखेर सलग सुट्ट्या आल्या आहेत. दि. २९ रोजी शनिवारची सुट्टी आहे. दि. ३० रोजी रविवार असून गुढीपाडवा आहे. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी होत असून महाराष्ट्रात हा सण मोठा प्रमाणावर साजरा केला जातो. शेतीशी संबंधित कामे व खरेदी विक्रीचे व्यवहार या दिवशी केले जातात. सोमवारी मुस्लिम बांधवांचा सण रमजान ईदची सुट्टी असली तरी भारत सरकारच्या लेखा नियंत्रकांकडून दि. ३० मार्च हा दिवस शासकीय व्यवहारासाठी काम गाजरचा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे या दिवशी ई कुबेर प्रणाली शासकीय व्यवहारासाठी सुरू राहणार आहे. तसेच मार्च अखेर सादर होणाऱ्या देयकांचा ओघ लक्षात घेता दि. ३० रोजी रात्री रोजी कोषागार व बँका कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मार्च अखेरीस दिनांक ३१ मार्च पर्यंत शासनाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयांचे कार्य दिनांक ३१ रोजी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर दिवशी देयक स्वीकृती व ई-कुबेर द्वारे देयकांची कामे पूर्ण करता येतील. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच धनादेशाद्वारे देयके देण्याच्या सूचना आहेत.

अकोला पॅटर्न यंदा राज्यभर

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये सादर झालेल्या देयकांचे प्रदान ३१ मार्च रोजी व त्यानंतर सुद्धा धनादेशाऐवजी ई कुबेर द्वारा करण्याचा यशस्वी प्रयोग कोषागार कार्यालय अकोला येथे करण्यात आला होता. सदर बाब विचारात घेऊन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सर्व कोषागार यामध्ये सादर होणाऱ्या देयकांचे प्रदान हे रात्री १२ नंतर सुद्धा धनादेशाद्वारे न करता ई कुबेर प्रणाली मार्फत करण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.