Ajit Pawar Speech Budget Session: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी शेरोशायरी करत विरोधकांना टोला लगावला. तसेच खुमासदार शैलीत विरोधकांना उत्तर दिले.

मागील वर्षी जाहिर केलेल्या काही योजना बंद केल्याच्या बातम्या येत आहेत. काही विरोधी आमदारांनीही याबाबतचा प्रश्न मांडला. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “काही योजना ह्या त्या त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार सुरु केल्या जातात. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात.”

लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांना प्रश्न विचारायचा होता. अजित पवार यांनी या योजनेचे नाव घेतले नसले तरी महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद करणार नसल्याचे सांगितले. “सरकारवर बोज पडतो, पण आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी तरतूद केली नाही, असा विरोधकांनी आरोप केला. पण अजून पावसाळी अधिवेशन आहे. हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे या दोन अधिवेशनात निधी दिला जाईल”, असे अजित पवार म्हणाले.

सरकार पाच वर्ष टिकणार

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत महाविकास आघाडीत येण्याचा सल्ला दिला होता. या विधानाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार त्यांचे नाव न घेता म्हणाले, “आम्ही हा अर्थसंकल्प केवळ चालू वर्षाचा विचार करून तयार केलेला नाही. तर पुढील पाच वर्षांचा विचार करून तयार केला आहे. या पाच वर्षांत कुणी गमतीने जरी म्हटले की, अमक्या-तमक्याने मुख्यमंत्री व्हा आणि पाठिंबा देतो. तरी ते काही शक्य नाही. तुमच्याकडे आमदारच नाहीत तर तुम्ही पाठिंबा कसला देणार? १० ते २० टाळकी (आमदार) असताना हे आम्हाला पाठिंबा देणार का?”

ब्रह्मदेव आला तरी सरकारला धक्का लागणार नाही

अजित पवारांनी आमदारांना टाळकी हा शब्द वापरल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत टाळकी म्हणू नका, असे म्हटले. त्यावरही अजित पवार म्हणाले की, मी आमदारांना नेहमीच सन्माननीय सदस्य म्हणत असतो. पण विरोधक ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावर ही प्रतिक्रिया होती. पण मी एक एक सांगतो, पाच वर्षांत ब्रह्मदेव आला तरी या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही.