Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळं राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत आहे, अशी ओरड अधूनमधून होत असते. सामाजिक न्याय मत्री संजय शिरसाट यांनीही याबद्दलची खदखद काही दिवसांपूर्वी व्यक्त केली. अर्थमंत्री अजित पवार हे आर्थिक शिस्तीबाबत काटेकोरपणे निर्णय घेत असतात. नुकतीच त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत तुम्ही सहकाऱ्यांना सावधान केलं नव्हतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी दिलेलं उत्तर अनेकांच्या भुवया उंचावणारं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

महायुती सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याचा सर्वाधिक अनुभव सध्या अजित पवार यांच्याकडे आहे. लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली, तेव्हा पैशांचं सोंग आपल्याला करता येणार नाही, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, मी जर त्यावेळी खरं सांगितलं असतं तर आम्ही परत आलोच नसतो. सरकार कसं येईल, हे बघणं महत्त्वाचं असतं.

आम्ही काय साधू-संत नाही

अजित पवार पुढं म्हणाले की, आम्ही काही साधू-संत नाही. आमचंही काही व्हिजन आहे. ते प्रत्यक्षात आणण्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. केंद्रात आमचं सरकार आहे. त्यांची मदत घेऊन राज्याचं उत्पन्न वाढवून आपण मार्ग काढू, असं माझं मन सागंत होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे.

“आम्ही कुठलीही योजना बंद करणार नाही, असं आधीच सांगितलं आहे. जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारची योजना एकसारखीच असते. तेव्हा आम्ही राज्याची योजना बंद करून केंद्राच्या योजनेचा लाभ घेतो. तसंच केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेचा लाभ घेत आहोत”, असंही अजित पवार म्हणाले.

‘भटकती आत्मा’ विधानाचा वेगळा परिणाम झाला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शरद पवारांना भटकती आत्मा असं म्हटलं गेलं. त्या विधानाचा वेगळा परिणाम झाला, असंही यावेळी अजित पवार म्हणाले. शरद पवार राजकारणात मुरलेले आहेत. त्यांनी या विधानाचा उपयोग करून माझा आत्मा भटकतोय, हे सांगायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देण्याकरता, दुधाला भाव देण्याकरता माझा आत्मा भटकतो आहे, असं सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला. त्यामुळे विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही आरोप प्रत्यारोप न करता सरकारची कामं सांगितली. लाडकी बहीण योजना लोकांमध्ये नेली. त्याला आम्हाला लाभ झाला.

Story img Loader