सोलापुरात शनिवारी (६ जानेवारी) रात्री झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्च्याप्रसंगी दोन जाती-धर्मामध्ये विद्वेष फैलावणारे वक्तव्य केल्याचा आरोप झाला. याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा यांच्यासह इतरांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हजारोंचा जनसमुदायासह निघालेल्या या मोर्च्याप्रसंगी रस्त्यावर हुल्लडबाजी करून दगडफेकही करण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्याचीही दखल घेऊन गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा, यसह हिंदुत्वाच्या इतर मुद्यांसाठी सकल हिंदू समाज नावाच्या संघटनेच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाळीवेस, टिळक चौक, कन्ना चौक मार्गे कन्ना चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत आमदार नितेश राणे व आमदार टी. राजा यांनी दोन जाती-धर्मामध्ये विद्वेष फैलावणारी आणि दुसऱ्या धर्मियांच्या विरोधात चिथावणी देणारी भाषणे केली.

सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चा

यातून अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे जेलरोड पोलीस ठाण्यात सहायक फौजदार देवीदास वाल्मिकी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आमदार राणे व आमदार राजा आणि सकल हिंदू समाज संघटनेचे समन्वयक सुधाकर बहिरवाडे यांच्यासह सभेच्या व्यासपीठावरील अन्य आठ ते दहा पदाधिकाऱ्यांविरूध्द भारतीय दंड विधान कलम १५३ (अ), २९५ (अ), १८८ सह ३४ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चा

हिंदू जन आक्रोश मोर्चा जात असताना त्यात भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य व आमदार विजय देशमुख यांनीही सहभाग घेतला होता. मात्र ते शेवटी सभेच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. मोर्चा मधला मारूती भागातून कोंतम चौकाकडे येत असताना वाटेत हुल्लडबाजी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या काही विशिष्ट दुकानांवर दगडाफेक करण्यात आली. दगडफेकीत काही निष्पाप व्यक्तींच्या डोक्याला दुखापत झाली. दुकानांतील साहित्याचेही नुकसान झाले. यासंदर्भातही पोलिसांत अज्ञातांविरूध्द गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सतीश शिंदे व शेखर स्वामी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हेही वाचा : सोलापुरात चोरट्यांची अशीही मजल; महिला पोलीस निरीक्षकाचे घर फोडले

यापूर्वीही कथित धर्मांतर, लव्ह जिहाद आदी मुद्यांवर सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला असता रस्त्यावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. वादग्रस्त विधाने करण्यात आमदार टी. राजा आणि आमदार नितेश राणे हे आघाडीवर असतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली होती. पोलिसांनी सभेला परवानगी देताना आमदार राणे व आमदार राजा या दोघांसह आयोजकांना परवानगीतील अटी व शर्तींचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बजावले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against bjp leader nitesh rane t raja in solapur for provocative speeches pbs